YouVersion Logo
Search Icon

२ इतिहास 8

8
शलमोनाची इतर कामगिरी
(१ राजे 9:10-28)
1शलमोनाला परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधण्यास वीस वर्षे लागली.
2त्यानंतर जी नगरे हूराम ह्याने शलमोनाला दिली होती त्यांची त्याने मजबुती केली व तेथे इस्राएल लोकांना वसवले.
3मग शलमोनाने हमाथ-सोबा नगरावर चाल करून ते हस्तगत केले.
4त्याने रानातील तदमोर आणि हमाथातील सर्व भांडारनगरे ह्यांची मजबुती केली.
5त्याने वरचे बेथ-होरोन व खालचे बेथ-होरोन ह्या दोन्ही तटबंदी नगरांची मजबुती कोट, वेशी व अडसर ह्यांनी केली.
6बालाथ नगर, शलमोनाची सर्व भांडारनगरे आणि त्याचे रथ व स्वार ठेवण्याची नगरे ह्या सर्वांची मजबुती केली; त्याप्रमाणेच यरुशलेमेत, लबानोनात व आपल्या राज्याच्या सर्व प्रदेशात जे काही शलमोनाला बांधकाम करावेसे वाटले ते सर्व त्याने केले.
7हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यातले जे अवशिष्ट लोक इस्राएल लोकांपैकी नव्हते,
8त्यांचे काही वंशज त्यांच्या पश्‍चात देशात राहून गेले होते व त्यांना इस्राएल लोकांच्याने अगदी नष्ट करवले नव्हते; अशांवर शलमोनाने वेठबिगार बसवली; आजपर्यंत तसेच चालले आहे.
9इस्राएल लोकांपैकी कोणासही शलमोनाने आपल्या कामासाठी दास करून ठेवले नाही; ते योद्धे, सरदार, सेनापती, रथ व स्वार ह्यांवरचे अधिकारी होते.
10लोकांवर हुकमत चालवणारे शलमोनाचे नायक अडीचशे होते.
11मग शलमोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधले होते त्यात तिला दावीदपुराहून आणले; तो म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोश आला आहे ती ती स्थाने पवित्र होत; म्हणून माझी पत्नी इस्राएलाचा राजा दावीद ह्याच्या मंदिरात राहता कामा नये.”
12मग शलमोनाने देवडीसमोर बांधलेल्या वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण केले;
13मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बाथवारी, चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण व मांडवांचा सण ह्या तीन नेमलेल्या वार्षिक सणांत तो होमबली अर्पण करीत असे.
14त्याने आपला बाप दावीद ह्याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांनाही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या कामांवर नेमले; प्रत्येक द्वाराजवळ द्वारपाळांच्या पाळ्या ठरवल्या; कारण देवाचा माणूस दावीद ह्याने अशीच आज्ञा केली होती.
15भांडारांसंबंधाने अथवा अन्य कोणत्याही बाबतीत राजाने याजक व लेवी ह्यांना जी आज्ञा दिली होती ती ते अवमानत नसत.
16परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हापासून ते पुरे होईपर्यंत शलमोनाचे सर्व काम सिद्धीस गेले. अशा प्रकारे परमेश्वराचे मंदिर पुरे झाले.
17मग शलमोन अदोम देशात समुद्रतीरी एसयोन-गेबेर व एलोथ ह्या नगरांत गेला.
18हूरामाने त्याच्याकडे आपल्या सेवकांच्या हाती गलबते व दर्यावर्दी लोक पाठवले; त्यांनी शलमोनाच्या कामदारांबरोबर ओफिरास जाऊन चारशे पन्नास किक्कार सोने शलमोनाला आणून दिले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for २ इतिहास 8