YouVersion Logo
Search Icon

२ इतिहास 32

32
सन्हेरीबाची स्वारी
(२ राजे 18:13-37; यश. 36:1-22)
1ह्या गोष्टी घडल्यावर व अशी निष्ठा प्रकट झाल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने येऊन यहूदात प्रवेश केला आणि तटबंदी नगरे जिंकून घेण्याच्या हेतूने त्याने त्यांच्यासमोर तळ दिला.
2सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिज्कीयाने पाहिले.
3तेव्हा त्याने आपले सरदार व योद्धे ह्यांची मसलत घेऊन नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद केले व ह्या कामी त्यांनी त्याला साहाय्य केले.
4पुष्कळ लोक जमा होऊन त्यांनी सर्व झरे बंद केले व देशामधून वाहणारा ओहोळही झाकून टाकला; ते म्हणाले, “अश्शूरचा राजा आल्यास त्याला मुबलक पाणी का मिळू द्यावे?”
5कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुन्हा बांधून काढला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला, दावीदपुरातल्या मिल्लो नावाच्या बुरुजाची मजबुती केली आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनवल्या.
6त्याने प्रजेवर सेनापती नेमून त्यांना नगराच्या वेशीच्या चौकात आपल्याकडे एकत्र केले व त्यांना धीर देण्यासाठी तो त्यांना म्हणाला, 7“दृढ व्हा, हिंमत धरा, अश्शूरचा राजा व त्याच्याबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका; त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे.
8मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.
9ह्यानंतर अश्शूरचा राजा सन्हेरीब हा आपल्या सर्व सैन्यासह लाखीशासमोर तळ देऊन राहिला होता. त्याने आपले सेवक हिज्कीया राजाकडे व यरुशलेमेत असलेल्या यहूद्यांकडे पाठवले व त्यांना निरोप कळवला की,
10“अश्शूराचा राजा सन्हेरीब म्हणतो, ‘यरुशलेम घेरले असता तुम्ही त्यात बसून राहिला आहात, तर तुमची भिस्त कशावर आहे?
11आमचा देव परमेश्वर आम्हांला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवील असे सांगून हिज्कीया तुम्हांला भ्रमात घालून तहानेने व भुकेने मारत आहे ना?’
12त्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना ह्याच हिज्कीयाने आज्ञा दिली की, ‘तुम्ही एकाच वेदीपुढे आराधना करावी व तिच्यावरच धूप जाळावा, हे खरे ना?’
13मी व माझ्या वडिलांनी देशोदेशीच्या सर्व लोकांचे काय केले हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आपला देश माझ्या हातून सोडवण्यास देशोदेशींच्या राष्ट्रांचे कोणी देव समर्थ झालेत का?
14माझ्या वाडवडिलांनी ज्या राष्ट्रांचा सर्वस्वी संहार केला त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांना माझ्या हातातून वाचवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तुम्हांला माझ्या हातातून कसा सोडवील?
15ह्यास्तव तुम्ही हिज्कीयास असे भुलवू व बहकवू देऊ नका; त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका; माझ्या हातातून व माझ्या वाडवडिलांच्या हातातून आपल्या लोकांचा बचाव करण्याची ताकद कोणत्याही राष्ट्राच्या किंवा राज्याच्या देवाला झाली नाही; तर माझ्या हातातून तुमचा बचाव करण्याची तुमच्या देवाला काय ताकद?”
16त्याच्या सेवकांनी परमेश्वर देवाची व त्याचा सेवक हिज्कीया ह्याची ह्यांहूनही अधिक निंदा केली.
17इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची निंदा करावी व त्याच्याविरुद्ध बोलावे ह्या हेतूने त्याने पत्रेही पाठवली; त्यात त्याने लिहिले की, “निरनिराळ्या देशांतील राष्ट्रांच्या देवांना आपले लोक माझ्या हातातून सोडवता आले नाहीत, त्याप्रमाणेच हिज्कीयाच्या देवाला आपले लोक माझ्या हातून सोडवता यायचे नाहीत.”
18जे यरुशलेमकर कोटावर बसले होते त्यांना त्यांनी यहूदी भाषेत हे शब्द उच्च स्वराने सांगितले; हेतू हाच की त्यांना घाबरवून त्यांची धांदल उडवावी आणि नगर हस्तगत करावे.
19‘पृथ्वीवरील मनुष्यांच्या हातांनी बनवलेल्या दैवतां-सारखाच यरुशलेमेचा देव आहे’ असे ते बोलले.
परमेश्वर हिज्कीयाची सुटका करतो
(२ राजे 19:1-37; यश. 37:1-38)
20ह्यावरून हिज्कीया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज ह्या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धावा केला.
21मग परमेश्वराने एक दूत पाठवला. त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूर वीर, प्रमुख व नायक ह्यांची कत्तल केली; तेव्हा तो फजीत होऊन आपल्या देशास परत गेला. तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या पोटच्याच मुलांनी त्याला तलवारीने मारून टाकले.
22ह्या प्रकारे परमेश्वराने हिज्कीयाला व यरुशलेमकरांना अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले, आणि तो त्यांना सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला.
23पुष्कळ लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया ह्याला मौल्यवान वस्तू नजर केल्या; ह्यामुळे तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला.
हिज्कीयाचे दुखणे
(२ राजे 20:1-11; यश. 38:1-22)
24त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला व त्याला एक चिन्ह दिले.
25पण हिज्कीयाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही; त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याच्यावर, यहूदावर व यरुशलेमेवर कोप झाला.
26तथापि हिज्कीया आणि यरुशलेमकर आपल्या हृदयाच्या उन्मत्ततेविषयी अनुताप पावून नम्र झाले, म्हणून परमेश्वराचा क्रोध हिज्कीयाच्या काळात त्यांच्यावर भडकला नाही.
हिज्कीया बाबेलच्या वकिलांचे स्वागत करतो
(२ राजे 20:12-19; यश. 39:1-8)
27हिज्कीयाला बहुत धन व मान मिळाला; त्याने सोने, रुपे, रत्ने, सुगंधी द्रव्ये, ढाली व नाना प्रकारची चांगली पात्रे ह्यांसाठी भांडारे बनवली.
28धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा उपज साठवण्यासाठीही त्याने कोठारे बांधली; तसेच सर्व तर्‍हेचे पशू व शेरडेमेंढरे ह्यांसाठी तबेले व मेंढवाडे बांधले.
29त्याने नगरे वसवली; शेरडेमेंढरे व गाईबैल ह्यांचे विपुल धन संपादले. परमेश्वराने त्याला बहुत धन दिले.
30ह्याच हिज्कीयाने गीहोन नावाचा वरचा पाट अडवून त्याचे पाणी दावीदपुराच्या पश्‍चिमेकडे नीट खाली आणले. हिज्कीया आपल्या सर्व कार्यांत यशस्वी झाला.
31तरीपण बाबेलच्या अधिपतींनी देशात घडलेल्या चमत्काराविषयी चौकशी करण्यास वकील पाठवले, तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्याला सोडून दिले.
हिज्कीयाचा मृत्यू
(२ राजे 20:20-21)
32हिज्कीयाची बाकीची कृत्ये व सत्कृत्ये संदेष्टा यशया बिन आमोज ह्याच्या दृष्टान्तग्रंथात आणि यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.
33हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीद वंशाच्या कबरस्तानातील उंचवट्यावर मूठमाती दिली. तो मृत्यू पावल्यावर सर्व यहूदी व यरुशलेमकर ह्यांनी त्याच्यासंबंधाने आदर व्यक्‍त केला. त्याचा पुत्र मनश्शे हा त्याच्या जागी राजा झाला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in