YouVersion Logo
Search Icon

२ इतिहास 20

20
मवाब आणि अम्मोन ह्यांच्यावर मिळवलेला विजय
1ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले.
2काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की, “समुद्रापलीकडून अराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे; तो जमाव हससोन-तामार उर्फ एन-गेदी येथवर आला आहे.”
3यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले.
4यहूदी लोक परमेश्वराचे साहाय्य मागण्यासाठी एकत्र झाले; यहूदाच्या सर्व नगरांतून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले.
5यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहूदी व यरुशलेमकर ह्यांच्या जमावांमध्ये उभा राहिला.
6तो म्हणाला, “हे आमच्या पूर्वजांच्या देवा, परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही.
7हे आमच्या देवा, तू ह्या देशाच्या रहिवाशांना आपल्या इस्राएल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहाम ह्याच्या वंशजांना कायमचा दिला आहेस ना? 8ते येथे वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रीत्यर्थ त्यांनी हे पवित्रस्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की, 9‘तलवार, दैवी क्षोभ, मरी अथवा दुष्काळ आमच्यावर आला तर ह्या मंदिरास तुझे नाम दिले आहे त्याच्यासमोर व तुझ्यासमोर आम्ही उभे राहून आमच्या संकटसमयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील.’
10पाहा, हे अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक; इस्राएल लोक मिसर देशाहून येत असताना त्यांना तू ह्यांच्यावर स्वारी करू दिली नाहीस; ते ह्यांच्याजवळून वळून निघून गेले, व ह्यांचा त्यांनी नाश केला नाही.
11पाहा, जे वतन तू आम्हांला दिले आहेस त्यातून आम्हांला घालवून देण्यासाठी ते आले आहेत; असे हे आमची उलटफेड करण्यास आले आहेत.
12हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या ह्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हांला ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हांला सुचत नाही; पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.”
13तेव्हा सर्व यहूदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले.
14मग आसाफ वंशातला यहजीएल बिन जखर्‍या बिन बनाया बिन यइएल बिन मत्तन्या लेवी हा ह्या मंडळीमध्ये उभा होता; त्याच्या ठायी परमेश्वराचा आत्मा उतरला.
15आणि तो म्हणाला, “अहो सर्व यहूद्यांनो, यरुशलेमनिवासी जनहो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका; परमेश्वर तुम्हांला सांगत आहे की, ‘हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे.
16उद्या त्यांच्याशी सामना करण्यास जा; पाहा, ते सीसघाट चढून येत आहेत, यरुएल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यांना गाठाल.
17ह्या लढाईत तुम्हांला लढावे लागणार नाही; हे यहूदा, हे यरुशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.’ घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.”
18मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लववले, त्याप्रमाणेच सर्व यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्यापुढे दंडवत घातले.
19आणि कहाथी व कोरही ह्यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे स्तवन उच्च स्वराने करू लागले.
20ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”
21सैन्याबरोबर बाहेर जाताना ‘परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे,’ हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले.
22ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेईर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते त्यांना गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसवले व त्यांनी त्यांचा मोड केला.
23अम्मोनी व मवाबी सेईर पहाडातल्या लोकांची अगदी कत्तल करून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांच्यावर उठले; सेइरनिवाशांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले.
24रानातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहूदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यांना दिसून आले.
25यहोशाफाट व त्याचे लोक लूट करायला आले तेव्हा त्या प्रेतांमध्ये बहुत धन, वस्त्रे1 व मोलवान अलंकार त्यांना मिळाले; ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यांना ते वाहून नेता येईनात; लूट एवढी होती की ते ती तीन दिवसपर्यंत करीत होते.
26चौथ्या दिवशी ते बराखा (आशीर्वाद) नावाच्या खोर्‍यात एकत्र झाले; तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला; त्या स्थळाला बराखा खोरे असे आजवर म्हणतात.
27मग सर्व यहूदातले लोक व यरुशलेमकर व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट हे मोठ्या आनंदाने यरुशलेमेकडे परत चालले, व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट होता. परमेश्वराने त्यांना आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करून देऊन हर्षभरित केले होते.
28ते सारंग्या, वीणा व कर्णे वाजवत यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरी आले.
29परमेश्वर इस्राएलाच्या शत्रूंशी लढला हे जेव्हा देशोदेशीच्या सर्व राज्यांतील लोकांनी ऐकले तेव्हा देवाचा धाक त्यांना बसला.
30अशा प्रकारे यहोशाफाटाच्या राज्यास स्वास्थ्य मिळाले; कारण त्याच्या देवाने त्याला चोहोकडून आराम दिला.
यहोशाफाटाची कारकीर्द
(१ राजे 22:41-50)
31यहोशाफाटाने यहूदावर राज्य केले; तो पस्तीस वर्षांचा असताना राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत पंचवीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव अजूबा, ती शिल्हीची कन्या.
32त्याची चालचलणूक त्याचा बाप आसा ह्याच्याप्रमाणे होती; ती त्याने सोडली नाही; परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले.
33तथापि उच्च स्थाने काढून टाकली नव्हती आणि लोकांनी अद्यापि आपल्या वडिलांच्या देवाकडे आपले चित्त लावले नव्हते.
34यहोशाफाटाची अथपासून इतिपर्यंतची अवशिष्ट कृत्ये हनानीचा पुत्र येहू ह्याची जी बखर इस्राएलाच्या राजांच्या ग्रंथात नमूद केली आहे तिच्यात लिहिलेली आहेत.
35ह्यानंतर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याने इस्राएलाचा राजा अहज्या ह्याच्याशी जूट केली; तो अहज्या फार दुराचार करीत असे.
36गलबते बांधून तार्शीश येथे जाता यावे म्हणून त्याने त्याच्याशी भागी केली; एसयोन-गेबर येथे त्यांनी जहाजे बांधली.
37तेव्हा मारेशावासी अलियेजर बिन दोदाबाहू ह्याने यहोशाफाटाविरुद्ध संदेश दिला; तो म्हणाला, “तू अहज्याशी भागी केलीस म्हणून तू केलेली कामे परमेश्वर मोडून टाकील.” ती जहाजे फुटून गेली, तार्शीशास जाऊ शकली नाहीत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for २ इतिहास 20