YouVersion Logo
Search Icon

२ इतिहास 17

17
यहोशाफाटाच्या राज्याची मजबुती
1त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला; इस्राएलाशी सामना करता यावा म्हणून त्याने आपली मजबुती केली.
2त्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले; यहूदा देशात आणि एफ्राइमातील जी नगरे त्याचा बाप आसा ह्याने हस्तगत केली त्यांत त्याने ठाणी बसवली.
3यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथमारंभी जसे वागला तसा वागला; तो बआलमूर्तीच्या नादी लागला नाही, म्हणून परमेश्वर त्याच्याबरोबर असे;
4तो आपल्या बापाच्या देवाला शरण गेला व त्याच्या आज्ञांप्रमाणे वागला; इस्राएलांच्या कृतीप्रमाणे तो वागला नाही.
5ह्यास्तव परमेश्वराने त्याच्या हातांनी राज्याची मजबुती केली; सर्व यहूदी लोक त्याला भेटी आणत, तो धन व मान ह्यांमुळे संपन्न झाला.
6परमेश्वराच्या मार्गांनी चालण्यात त्याच्या मनास उत्साह वाटे; त्याने यहूदातून उच्च स्थाने व अशेरा मूर्ती काढून टाकल्या.
7त्याने आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सरदार बेन-हईल, ओबद्या, जखर्‍या, नथनेल व मीखाया ह्यांना यहूदाच्या नगरांना शिस्त लावण्यासाठी पाठवले;
8त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शमीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया, तोब-अदोनीया हे लेवी आणि अलीशामा व अहोराम हे याजक त्याने पाठवले.
9त्यांनी आपल्याबरोबर परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन यहूदाच्या नगरात जाऊन शिक्षण दिले; यहूदाच्या सर्व नगरांत फिरून त्यांनी लोकांना शिकवले.
10यहूदाच्या आसपासच्या सर्व देशांच्या राजांना परमेश्वराचा असा धाक बसला की त्यांनी यहोशाफाटाशी युद्ध केले नाही.
11कित्येक पलिष्ट्यांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली; अरबी लोक सात हजार सातशे मेंढरे व सात हजार सातशे बकरी ह्यांचे कळप घेऊन त्याच्याकडे आले.
12यहोशाफाट फार थोर झाला व त्याने यहूदात गढ्या व भांडारनगरे बांधली.
13यहूदाच्या नगरात त्याची मोठमोठी कामे चालत; यरुशलेमेत त्याचे शूर वीर राहत.
14त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांची गणती ही : यहूदाच्या सहस्रपतींचा अदना नायक असून त्याच्याबरोबर तीन लक्ष शूर वीर होते;
15त्याच्या खालोखाल यहोहानान नायक असून त्याच्याबरोबर दोन लक्ष ऐंशी हजार पुरुष होते,
16त्याच्या खालोखाल जिख्रीचा पुत्र अमस्या हा असून त्याने आपल्या खुशीने स्वतःस परमेश्वराला वाहून घेतले होते; त्याच्याबरोबर दोन लक्ष शूर वीर होते;
17बन्यामिन्यांपैकी एल्यादा हा एक महान योद्धा असून त्याच्याबरोबर धनुर्धारी व लढवय्ये दोन लक्ष लोक होते;
18त्याच्या खालोखाल यहोजाबाद हा असून त्याच्याबरोबर युद्धास तयार असे एक लक्ष ऐंशी हजार पुरुष होते;
19हे सर्व राजाच्या तैनातीस असत; राजाने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले होते ते वेगळेच.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for २ इतिहास 17