YouVersion Logo
Search Icon

२ इतिहास 12

12
शिशक यहूदावर स्वारी करतो
(१ राजे 14:21-31)
1रहबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला तेव्हा त्याने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले.
2त्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी मिसर देशाचा राजा शिशक यरुशलेमेवर चाल करून आला; कारण त्याने परमेश्वराचा अपराध केला.
3बाराशे रथ व साठ हजार स्वार घेऊन त्याने यरुशलेमेवर स्वारी केली; मिसरातून त्याच्याबरोबर लूबी, सुक्की व कूशी हे लोक आले, ते असंख्य होते.
4यहूदाची तटबंदी नगरे घेत घेत तो यरुशलेमेपर्यंत आला.
5तेव्हा रहबाम व यहूदाचे सरदार शिशकाच्या भीतीने यरुशलेमेत एकत्र मिळाले असता त्यांच्याकडे शमाया संदेष्टा येऊन म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही मला सोडले म्हणून मीही तुम्हांला सोडून तुम्हांला शिशकाच्या हाती दिले आहे.”’ 6तेव्हा इस्राएलाचे सरदार व राजा हे दीन झाले व म्हणू लागले की, “परमेश्वर न्यायी आहे.”
7ते दीन झाले आहेत असे परमेश्वराने पाहिले तेव्हा परमेश्वराचे वचन शमायास प्राप्त झाले की, “ते दीन झाले आहेत म्हणून मी त्यांचा नाश करणार नाही; मी लवकरच त्यांचा बचाव करीन; माझ्या क्रोधाचा वर्षाव शिशकाच्या हस्ते मी यरुशलेमेवर करणार नाही.
8माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.”
9मिसर देशाचा राजा शिशक ह्याने यरुशलेमेवर स्वारी केली; त्याने परमेश्वराच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले; शलमोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेल्या.
10रहबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणारे जे राजवाड्याची रखवाली करीत असत त्यांच्या स्वाधीन त्या केल्या.
11राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा हे धावणारे त्या ढाली घेऊन पुढे चालत आणि मग त्या आपल्या चौकीत आणून ठेवत.
12रहबाम दीन झाला तेव्हा परमेश्वराचा त्याच्यावरचा कोप शमला; त्याने त्याचा पुरा नाश केला नाही; शिवाय यहूदाच्या ठायी काही चांगल्या गोष्टी अद्यापि राहिल्या होत्या.
13ह्या प्रकारे रहबाम राजाने यरुशलेमेत आपली मजबुती करून तेथे राज्य केले; रहबाम राज्य करू लागला तेव्हा तो एकेचाळीस वर्षांचा होता, व परमेश्वराने आपल्या नामाच्या निवासासाठी म्हणून जे यरुशलेम नगर सर्व इस्राएल वंशांतून निवडून घेतले होते तेथे त्याने सतरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती.
14जे वाईट ते त्याने केले, कारण परमेश्वराच्या भजनी त्याने चित्त लावले नाही.
15रहबामाची अथपासून इतिपर्यंतची कृत्ये शमाया संदेष्टा व इद्दो द्रष्टा ह्यांच्या बखरीत वंशावळ्यांच्या क्रमानुसार लिहिलेली आहेत, नाहीत काय? रहबाम व यराबाम ह्यांच्या नेहमी लढाया चालू असत.
16रहबाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली; त्याच्या जागी त्याचा पुत्र अबीया राजा झाला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in