YouVersion Logo
Search Icon

२ इतिहास 10

10
इस्राएलाचे बंड
(१ राजे 12:1-24)
1रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते.
2नबाटाचा पुत्र यराबाम हा शलमोन राजासमोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता तेथे त्याने हे ऐकले.
3मग लोकांनी त्याला बोलावून आणले; तेव्हा यराबाम व इस्राएलाची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाली, 4“आपल्या बापाने आमच्यावर जू ठेवले होते ते भारी होते; तर आता आपल्या बापाने आमच्यावर लादलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ.”
5त्याने त्यांना सांगितले, “आता जा आणि तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” हे ऐकून ते गेले.
6रहबाम राजाने आपला बाप शलमोन जिवंत असता जी वृद्ध माणसे त्याच्या पदरी होती त्यांचा सल्ला घेतला; तो म्हणाला, “ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता?”
7ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांवर मेहेरनजर करून ह्यांना संतुष्ट राखाल आणि मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर हे आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”
8ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले तरुण पुरुष त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला.
9त्याने त्यांना विचारले, “तुमच्या पित्याने आपल्यावर ठेवलेले जू हलके करा असे म्हणणार्‍या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय सल्ला देता?”
10त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुण पुरुषांनी त्याला उत्तर दिले, “हे लोक आपणाला म्हणतात की, ‘आपल्या बापाने आमच्यावर भारी जू लादले होते तर आता आपण ते हलके करा,’ तर त्यांना असे सांगा की माझी करांगुली माझ्या बापाच्या कंबरेपेक्षा मोठी आहे.
11माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले ते मी आणखी भारी करणार; माझा बाप तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, तर मी तुम्हांला विंचवांनी ताडन करीन.”’
12“तिसर्‍या दिवशी माझ्याकडे यावे” असे राजाने त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे तिसर्‍या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले.
13तेव्हा रहबाम राजाने त्यांना कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध पुरुषांचा सल्ला टाकून
14त्या तरुण पुरुषांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यांना म्हणाला, “माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले होते, पण मी ते अधिक भारी करणार; माझा बाप तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, मी तुम्हांला विंचवांनी ताडन करीन.”
15अशा प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही; ह्याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याला दिले होते ते पूर्ण व्हावे अशी देवाची योजना होती.
16राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही, हे इस्राएला, आपल्या डेर्‍यांकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग सर्व इस्राएल लोक आपापल्या डेर्‍याकडे चालते झाले.
17जे इस्राएल लोक यहूदाच्या नगरांत वस्ती करून राहिले होते त्यांच्यावर मात्र रहबामाने राज्य केले.
18रहबाम राजाने वेठीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा हदोराम ह्याला पाठवले; त्याला इस्राएल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला. ह्या प्रकारे इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली ती आजवर चालू आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in