१ शमुवेल 9
9
राजपदी शौलाची निवड
1एक बन्यामिनी मनुष्य होता, त्याचे नाव कीश बिन अबीएल बिन सरोर बिन बखोरथ बिन अफिया असे होते; हा एका बन्यामिनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता.
2त्याचा शौल नावाचा एक मुलगा होता, तो तरुण व देखणा होता; इस्राएल लोकांत त्याच्याइतका देखणा कोणी नव्हता; तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत.
3एकदा शौलाचा बाप कीश ह्याची गाढवे चुकली तेव्हा कीश आपला पुत्र शौल ह्याला म्हणाला, “आपल्याबरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव.”
4त्याने एफ्राइमाचा डोंगरी प्रदेश व शलीशा प्रांत पायांखाली घातला तरी ती त्याला सापडली नाहीत; मग ते शालीम प्रांतात गेले तेथेही ती नव्हती; नंतर ते बन्यामिन्यांच्या प्रांतात गेले तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही.
5ते सूफ प्रांतात आले तेव्हा शौल आपल्याबरोबरच्या गड्याला म्हणाला, “चल, आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपलीच चिंता करीत बसेल.”
6तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, ह्या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकांत मोठी मानमान्यता आहे; तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते; चल, आपण तिकडे जाऊ; आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल.”
7तेव्हा शौल आपल्या गड्याला म्हणाला, “हे पाहा, त्याच्याकडे जायचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? आपल्या थैलीतल्या भाकरी संपल्या आहेत; त्या देवाच्या माणसासाठी न्यायला आपल्याजवळ काही भेट नाही; आपल्याजवळ काय आहे?”
8त्या गड्याने शौलाला उत्तर दिले, “माझ्याजवळ पाव शेकेल रुपे आहे, तेवढे मी त्या देवाच्या माणसाला दिले म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो सांगेल.”
9(पूर्वीच्या काळी इस्राएलात कोणी देवाकडे प्रश्न करण्यास जाई तेव्हा तो म्हणत असे की, “चला, द्रष्ट्याकडे जाऊ;” हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पूर्वी द्रष्टा म्हणत.) 10शौल आपल्या गड्यास म्हणाला, “ठीक आहे, चल आपण जाऊ.” मग तो देवाचा माणूस राहत होता त्या नगरात ते गेले.
11ते चढण चढून नगरात जात असता काही तरुण मुली पाणी भरण्यासाठी जात होत्या त्या त्यांना भेटल्या; त्यांना त्यांनी विचारले, “तो द्रष्टा येथे आहे काय?”
12तेव्हा त्या म्हणाल्या, “होय, आहे; पाहा, तो पुढेच आहे; त्वरा करा, कारण तो आजच गावी आला आहे, आज लोक उच्च स्थानी होमहवन करणार आहेत.
13तर तुम्ही नगरात जाताच तो त्या उच्च स्थानी भोजनास जाण्याच्या अगोदर तुम्हांला भेटेल; तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तेथे येण्यापूर्वी लोक जेवत नसतात; नंतर आमंत्रित लोक भोजन करतात. तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्याची भेट होईल.”
14ते वर नगराकडे गेले; आणि ते नगरात जाऊन पोहचतात तो शमुवेल उच्च स्थानी जाण्यासाठी निघाला होता तो त्यांना समोरून येताना भेटला.
15शौल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमुवेलास आदेश दिला होता की,
16“उद्या ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवील; कारण माझ्या लोकांचे गार्हाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे.”
17शौल शमुवेलाच्या दृष्टीस पडला तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हा; हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवील.”
18मग शौल वेशीजवळ शमुवेलाकडे जाऊन म्हणाला, “द्रष्ट्यांचे घर कोठे आहे ते मला सांगा.”
19शमुवेल शौलाला म्हणाला, “द्रष्टा मीच आहे, माझ्यापुढे उच्च स्थानी चला; आज तुम्ही माझ्याबरोबर भोजन करावे; सकाळी तुझी रवानगी करतेवेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन.
20तीन दिवसांमागे चुकलेल्या तुझ्या गाढवांसंबंधाने काही चिंता करू नकोस, कारण ती सापडली आहेत. इस्राएलातली सर्व संपत्ती कोणासाठी आहे? तुझ्यासाठी व तुझ्या बापाच्या घराण्यासाठी आहे की नाही?”
21शौल म्हणाला, “इस्राएल वंशांतले सर्वांहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यांतला मी ना? आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना? तर मग तुम्ही माझ्याशी असले भाषण का करता?”
22शमुवेलाने शौलाला व त्याच्या गड्याला भोजनगृहात नेले; आणि तेथे सुमारे तीस जण आमंत्रित होते, त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुखस्थानी त्यांना बसवले.
23शमुवेलाने आचार्याला सांगितले, “जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितले होते तो घेऊन ये.”
24आचार्याने मांसाचा फरा व त्याबरोबर जे काही होते ते वर उचलले आणि शौलापुढे ठेवले. तेव्हा शमुवेल म्हणाला, “हे पाहा, हे राखून ठेवलेले आहे, हे आपणासमोर ठेवून खा; कारण मी लोकांना आमंत्रण केले तेव्हापासून ह्या नेमलेल्या वेळेपर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे.” ह्या प्रकारे शौलाने त्या दिवशी शमुवेलाबरोबर भोजन केले.
25मग त्या उच्च स्थानावरून उतरून ते नगरात आले; तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शौलाशी एकान्तात बोलणे केले.
26सकाळी ते पहाटेस उठले व सूर्योदयाच्या सुमारास शौल धाब्यावर होता त्याला शमुवेलाने हाक मारून म्हटले, “ऊठ, मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि तो व शमुवेल असे दोघे बाहेर पडले.
27गाव संपतो तेथे खाली उतरत असता शमुवेल शौलाला म्हणाला, “आपल्या गड्याला पुढे जाऊ दे (त्याप्रमाणे तो पुढे गेला), तू अंमळ थांब; मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवतो.”
Currently Selected:
१ शमुवेल 9: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.