YouVersion Logo
Search Icon

१ शमुवेल 6

6
पलिष्टी कोश परत करतात
1परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या मुलखात सात महिने राहिला होता.
2नंतर पलिष्ट्यांनी याजकांना व शकुन पाहणार्‍यांना बोलावून विचारले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थानी पाठवावा?”
3ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश तुम्ही माघारी पाठवणार तर तो नुसता पाठवू नका; त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा म्हणजे तुम्ही बरे व्हाल व अद्यापि तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हांला कळेल.”
4ते म्हणाले, “त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोणते?” ते म्हणाले, “पलिष्टी सरदारांच्या संख्येइतक्या ग्रंथींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे.
5ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्यांच्या प्रतिमा करा; आणि इस्राएलाच्या देवाचा महिमा मान्य करा म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवांवरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील.
6मिसरी लोक आणि फारो ह्यांनी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने का कठीण करता? देवाने मिसरी लोकांमध्ये अद्भुत कृत्ये केली तेव्हा इस्राएल लोकांना त्यांनी जाऊ दिले, आणि ते निघून गेले, हे खरे ना?
7तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा; आणि ज्यांच्यावर अद्यापि जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गाई घेऊन गाडीस जुंपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा.
8मग परमेश्वराचा कोश उचलून त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही त्याच्याकडे पाठवाल त्या एका करंड्यात घालून कोशाच्या बाजूस ठेवा; मग ती गाडी चालू करून रस्त्याने जाऊ द्या.
9मग हे पाहा, जर तो आपल्या देशाच्या वाटेने बेथ-शेमेशाकडे गेला तर समजा की त्यानेच आमच्यावर ही पीडा पाठवली होती; तसे न झाले तर त्याच्या हाताने आमच्यावर हा मार पडला नसून आम्हांला ही पीडा दैवगतीने प्राप्त झाली आहे असे आपण समजू.”
10त्याप्रमाणे त्या लोकांनी केले; त्यांनी दोन दुभत्या गाई घेऊन गाडीस जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी कोंडून ठेवली.
11त्या गाडीवर परमेश्वराचा कोश आणि सोन्याचे उंदीर व ग्रंथींच्या प्रतिमा आत असलेला करंडा ठेवला.
12त्या गाईंनी थेट बेथ-शेमेशचा रस्ता धरला; रस्त्याने त्या हंबरत गेल्या, उजवीडावीकडे वळल्या नाहीत; पलिष्ट्यांचे सरदार त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.
13ह्या प्रसंगी बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात गव्हाची कापणी करत होते; त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा त्यांच्या दृष्टीस कोश पडला; तो पाहून त्यांना आनंद झाला.
14ती गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात जाऊन उभी राहिली; तेथे एक मोठी धोंड होती. मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गाईंचा परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अर्पण केला.
15परमेश्वराचा कोश आणि त्याबरोबर सोन्याच्या वस्तू असलेला करंडा होता तो लेव्यांनी उतरवून त्या धोंडेवर ठेवला; मग त्या दिवशी बेथ-शेमेशकरांनी परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणे व यज्ञ केले.
16हे पाहून पलिष्ट्यांचे पाच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
17पलिष्ट्यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथींच्या सुवर्णप्रतिमा पाठवल्या त्या अश्दोदासाठी एक, गज्जासाठी एक, अष्कलोनासाठी एक, गथासाठी एक व एक्रोनासाठी एक अशा होत्या;
18ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता तेथवर पलिष्ट्यांच्या पाच सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठवले होते; ती धोंड यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात आजपर्यंत आहे.
19बेथ-शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्याने त्या लोकांतले पन्नास हजार सत्तर पुरुष जिवे मारले; परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला.
20बेथ-शेमेशकर म्हणू लागले, “ह्या परमेश्वरासमोर, ह्या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा?”
21मग त्यांनी किर्याथ-यारीमच्या लोकांकडे जासूद पाठवून सांगितले की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for १ शमुवेल 6