१ शमुवेल 4
4
पलिष्टी कोश हस्तगत करतात
1शमुवेलाची ही हकिकत सर्व इस्राएलात पसरली. ह्यानंतर इस्राएल लोक पलिष्ट्यांशी लढण्यास निघाले; त्यांनी एबन-एजर येथे तळ दिला, आणि पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला.
2पलिष्ट्यांनी इस्राएलांशी सामना करण्यासाठी व्यूहरचना केली; लढाईस तोंड लागून पलिष्ट्यांपुढे इस्राएल लोक पराभव पावले; व त्यांनी त्यांच्या सेनेपैकी सुमारे चार हजार पुरुषांची रणांगणात कत्तल केली.
3लोक छावणीत परत आले तेव्हा इस्राएलाचे वडील जन म्हणू लागले, “परमेश्वराने आज आमचा पलिष्ट्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आपण आणू या; तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल.”
4तेव्हा लोकांनी शिलो येथे माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करूबारूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणवला; देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे होते.
5परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्राएलांनी एवढा जयघोष केला की त्याने भूमी दणाणली.
6हा जयघोष ऐकून पलिष्टी म्हणू लागले, “इब्र्यांच्या छावणीत हा एवढा जयघोष कशाचा असावा?” मग त्यांना कळून आले की, परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला आहे.
7तेव्हा पलिष्टी भयभीत होऊन म्हणाले, “देव छावणीत आला आहे; हायहाय, आता आमचे काय होईल! अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती.
8हायहाय, आता आमचे काय होईल! अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिसरी लोकांना तर्हतर्हेच्या पीडांनी पिडले तेच हे देव होत.
9तर अहो पलिष्ट्यांनो, हिंमत धरा, मर्दांप्रमाणे वागा; इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका; तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा.”
10मग पलिष्टी लढले आणि इस्राएल लोक पराभव पावून सगळे आपापल्या डेर्याकडे पळून गेले; त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्राएलाचे तीस हजार पायदळ कामास आले.
11परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला, आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास ठार झाले.
12त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला; त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती.
13तो तेथे आला तेव्हा एली रस्त्याच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता; कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले.
14ह्या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा त्याने विचारले, “हा हलकल्होळ कसला?” तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला ते वर्तमान सांगितले.
15एली ह्या वेळी अठ्याण्णव वर्षांचा होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते.
16तो मनुष्य एलीला म्हणाला, “सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच; मी आज सैन्यातून पळून आलो आहे.” तेव्हा तो त्याला म्हणाला, “मुला, काय समाचार आहे?”
17त्या बातमी आणणार्याने उत्तर दिले की, “इस्राएलाने पलिष्ट्यांपुढे पळ काढला, लोकांची मोठी कत्तल उडाली, हफनी व फिनहास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोश हस्तगत झाला.”
18देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला; तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो चाळीस वर्षे इस्राएलाचा शास्ता होता.
19त्याची सून फिनहासची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता; देवाचा कोश नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या व ती ओणवी होऊन प्रसूत झाली.
20तिचा प्राण जातेसमयी ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, “भिऊ नकोस, तुला पुत्र झाला आहे.” पण ती काहीएक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही.
21तिने त्या बालकाचे नाव ईखाबोद (वैभव नाहीसे झाले) असे ठेवले; ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव नाहीसे झाले आहे.” देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली.
22ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेला आहे.”
Currently Selected:
१ शमुवेल 4: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.