YouVersion Logo
Search Icon

१ शमुवेल 23

23
कईलात आणि रानात दावीद लपून राहतो
1दाविदाला बातमी लागली की पलिष्टी लोक कईला नगराशी लढत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.
2तेव्हा दाविदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” परमेश्वर त्याला म्हणाला, “जा, पलिष्ट्यांवर मारा करून कईलाचा बचाव कर.
3दाविदाचे लोक त्याला म्हणाले, “पाहा, येथे यहूदात जर आम्हांला भीती आहे तर पलिष्ट्यांच्या सैन्यावर आम्ही कईलाकडे चालून गेलो तर मग काय विचारावे?”
4दाविदाने परमेश्वराला पुन्हा प्रश्‍न केला, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, “ऊठ, कंबर बांधून कईलास जा; मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”
5मग दावीद व त्याचे लोक कईलास गेले; त्यांनी पलिष्ट्यांशी युद्ध करून त्यांची गुरेढोरे हाकून आणली आणि त्यांची मोठी कत्तल केली. ह्या प्रकारे दाविदाने कईला येथील रहिवाशांचे रक्षण केले.
6अहीमलेखाचा पुत्र अब्याथार हा कईला येथे दाविदाकडे पळून गेला तेव्हा तो हाती एफोद घेऊन गेला होता.
7दावीद कईला येथे गेला हे कोणी शौलाला कळवले तेव्हा तो म्हणाला, “आता देवाने त्याला माझ्या हाती दिले आहे; कारण दरवाजे व अडसर असलेल्या नगरात जाऊन तो आयताच कोंडला गेला आहे.”
8तेव्हा कईलास जाऊन दाविदाला व त्याच्या लोकांना घेरावे म्हणून शौलाने आपल्या सर्व लोकांना युद्धासाठी बोलावले.
9शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”
10मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, शौल माझ्यामुळे कईला नगराचा नाश करण्यासाठी येऊ पाहत आहे, हे वर्तमान तुझ्या दासाने तरी नक्की ऐकले आहे.
11कईला येथील लोक मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या दासाच्या कानावर आले आहे त्याप्रमाणे शौलाचे येणे होईल काय? हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तुझी मी विनवणी करीत आहे. तुझ्या दासाला काय ते सांग.” परमेश्वर म्हणाला, “तो येईल.”
12दाविदाने विचारले, “कईलाचे लोक मला व माझ्या लोकांना शौलाच्या हाती देतील काय?” परमेश्वर म्हणाला, “होय देतील.”
13तेव्हा दावीद व त्याचे सुमारे सहाशे लोक कईलातून निघून वाट फुटेल तिकडे गेले. दावीद कईलाहून निसटून गेला हे शौलाला कोणी सांगितले, तेव्हा त्याने निघण्याचे रहित केले.
14मग दावीद रानातील गढ्यांमध्ये राहू लागला; तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शौल त्याचा शोध नित्य करीत असे; पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही.
15दाविदाला कळून चुकले होते की शौल आपला प्राण घ्यायला निघाला आहे. दावीद जीफ नावाच्या रानात एका उंचवट्यावरील झाडीत राहिला होता.
16तेव्हा शौलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या उंचवट्यावरील झाडीत गेला व देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली.
17त्याने त्याला म्हटले, “भिऊ नकोस, माझा पिता शौल ह्याच्या हाती तू लागणार नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शौल ह्यालाही हे ठाऊक आहे.”
18त्या दोघांनी परमेश्वरापुढे करार केला; मग दावीद त्या उंचवट्यावरील झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.
19नंतर जिफी लोक गिबा येथे शौलाकडे येऊन म्हणाले, “रानाच्या दक्षिणेस हकीलाच्या डोंगरात उंचवट्यावरील झाडीतल्या गढ्यांमध्ये आमच्याकडे दावीद लपून राहिला आहे ना?
20तर आता, महाराज, आपली खाली येण्याची उत्कट इच्छा आहे, तिच्यानुसार खाली या; राजाच्या हाती त्याला देणे हे आमचे काम.”
21शौल म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो; कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे;
22तुम्ही जाऊन आणखी खात्री करून घ्या; त्याची बसण्याउठण्याची जागा कोठे आहे, तेथे तो कोणाच्या दृष्टीस पडला, ह्याची सगळी माहिती काढा; कारण तो मोठा धूर्त आहे;
23तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुमच्याबरोबर परत येईन; तो ह्या देशात कोठेही असला तरी मी ह्या यहूदाच्या हजारो लोकांतून त्याला हुडकून काढीन.”
24मग ते निघून शौलाच्या अगोदर जीफ येथे गेले; पण दावीद व त्याचे लोक रानाच्या दक्षिणेस अराबात मावोनाचे अरण्य आहे तेथील मैदानात होते.
25शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधासाठी गेला; ही बातमी दाविदाला समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मावोनाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलाला समजले तेव्हा त्याने मावोनाच्या रानात दाविदाचा पाठलाग केला.
26शौल डोंगराच्या ह्या बाजूने चालला आणि दावीद व त्याचे लोक डोंगराच्या त्या बाजूने चालले. शौलाच्या भीतीने दावीद निसटून जाण्याची त्वरा करीत होता, कारण शौल व त्याचे लोक दाविदाला व त्याच्या लोकांना पकडण्यासाठी त्यांना घेरू पाहत होते.
27इतक्यात एका जासुदाने शौलाला येऊन सांगितले, “चला, त्वरा करा, कारण पलिष्ट्यांनी देशावर स्वारी केली आहे.
28तेव्हा शौल दाविदाचा पाठलाग करण्याचे सोडून पलिष्ट्यांशी सामना करण्यासाठी गेला म्हणून त्या ठिकाणाचे नाव सेला-हम्मालकोथ (निसटून जाण्याचा खडक) असे पडले.
29दावीद तेथून निघून एन-गेदीच्या गढ्यांमध्ये राहू लागला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in