YouVersion Logo
Search Icon

१ शमुवेल 15

15
शौलाने आज्ञाभंग केल्यावर परमेश्वराने त्याचा त्याग केला
1शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपली प्रजा इस्राएल लोक ह्यांच्यावर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करण्यास मला पाठवले होते; तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक.
2सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ’इस्राएल मिसरातून येत असता अमालेक मार्गात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्यांच्याशी कसा वागला ह्याचे मला स्मरण आहे.
3तर आता जाऊन अमालेकास मार दे; त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नकोस; पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे ह्या सर्वांचा संहार कर.”’
4मग शौलाने लोकांना जमा करून तलाईम येथे त्यांची मोजणी केली, तेव्हा दोन लक्ष पायदळ व यहूदातील दहा हजार पुरुष भरले.
5नंतर शौल अमालेक्यांच्या एका नगराजवळ जाऊन खोर्‍यात दबा धरून बसला.
6शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हायचा; कारण इस्राएल लोक मिसरातून आले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी स्नेहभावाने वर्तला.” ह्यावरून केनी अमालेक्यांतून निघून गेले.
7मग शौलाने हवीलापासून मिसरासमोरील शूराच्या मार्गापर्यंत अमालेक्यांना मार देत नेले.
8त्याने अमालेक्यांचा राजा अगाग ह्याला जिवंत पकडले, आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला.
9तरीपण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखले; त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशू, कोकरे आणि जेजे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले; त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला.
10मग शमुवेलाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,
11“मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे; कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” ह्यावरून शमुवेलाला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करत राहिला.
12सकाळी अगदी पहाटेस शमुवेल उठून शौलाला भेटायला गेला; तेव्हा त्याला कोणी सांगितले की, “शौल कर्मेलास आला आहे आणि तेथे स्वतःच्या स्मरणार्थ त्याने एक विजयस्तंभ उभारला व चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे.”
13शमुवेल शौलाकडे आला तेव्हा शौल त्याला म्हणाला, “परमेश्वर आपले कल्याण करो; मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे.”
14शमुवेल म्हणाला, “तर शेरडामेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे ह्याचा अर्थ काय?”
15शौल म्हणाला, “लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत; बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे.”
16शमुवेल शौलाला म्हणाला, “पुरे कर; परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो.” तो म्हणाला, “सांगा.”
17शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?”
18मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, ‘जा, त्या पापी अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.’
19असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाहीस? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?”
20शौल शमुवेलाला म्हणाला, “मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे; परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग ह्याला घेऊन आलो आहे.
21पण ज्या लुटीचा नाश करायचा होता तिच्यातून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर ह्याला गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत.”
22तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.
23अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”
24तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे; कारण मी लोकांना भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले.
25तर आता माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून माझ्याबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन.”
26शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत येणार नाही; कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे, आणि परमेश्वराने इस्राएलावरील राजपदावरून तुला झुगारले आहे.”
27शमुवेल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला.
28तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “परमेश्वराने इस्राएलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे.
29जो इस्राएलाचे केवळ वैभव आहे, तो खोटे बोलणार नाही; तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही.”
30मग तो म्हणाला, “मी तर पाप केलेच आहे, तरीपण आता माझ्या प्रजेच्या वडील जनांसमोर व इस्राएलासमोर माझा मान राखा व माझ्याबरोबर परत या म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याची मी उपासना करीन.”
31ह्यामुळे शमुवेल शौलामागून परत गेला आणि शौलाने परमेश्वराची उपासना केली.
32मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्यांचा राजा अगाग ह्याला माझ्याकडे घेऊन या.” तेव्हा अगाग बेड्या घातलेला असा त्याच्याकडे आला. अगाग म्हणाला, “आता आपले मरणसंकट खात्रीने टळले आहे.”
33शमुवेल त्याला म्हणाला, “तुझ्या तलवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत, त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वरासमोर अगागाचे तुकडे तुकडे केले.
34मग शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला.
35शमुवेल मरेपर्यंत पुन: शौलाच्या भेटीला गेला नाही; तरी शमुवेल शौलासाठी विलाप करीत असे; आणि आपण शौलाला इस्राएलावर राजा केले ह्याचा परमेश्वराला अनुताप झाला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in