१ शमुवेल 13
13
पलिष्ट्यांबरोबर युद्ध
1शौल तीस1 वर्षांचा असता राज्य करू लागला. त्याने दोन वर्षे इस्राएलावर राज्य केल्यावर, 2इस्राएलातले तीन हजार पुरुष निवडले; त्यांपैकी दोन हजार शौलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि एक हजार योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले; वरकड सर्व लोकांना त्याने आपापल्या डेर्यांकडे रवाना केले.
3गिबा येथे पलिष्ट्यांचे ठाणे होते त्यावर योनाथानाने मारा केला; हे वर्तमान पलिष्ट्यांच्या कानी गेले. मग शौलाने देशभर रणशिंग वाजवून लोकांना सांगितले की, “इब्री लोकहो, कान द्या.”
4शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर मारा केला आणि पलिष्टी लोकांना इस्राएलाचा वीट आला, हे सर्व इस्राएलाच्या कानी गेले. हे ऐकून लोक शौलाजवळ गिलगालात जमा झाले.
5तेव्हा पलिष्टी लोक इस्राएल लोकांशी लढण्यास जमा झाले; तीस हजार रथ, सहा हजार स्वार आणि समुद्रकिनार्यावरील वाळूइतके विपुल लोक एकत्र झाले; त्यांनी बेथ-आवेनाच्या पूर्वेला जाऊन मिखमाश येथे तळ दिला.
6आपण पेचात सापडलो आहोत असे इस्राएल लोकांनी पाहिले, (खरोखरच त्या लोकांना संकट प्राप्त झाले होते,) तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे ह्यांत लपले.
7कित्येक इब्री लोक यार्देन ओलांडून गाद व गिलाद ह्या प्रांतांत गेले, पण शौल गिलगालातच राहिला व सर्व लोक थरथरा कापत त्याच्या मागून गेले.
8शमुवेलाने मुदत ठरवली होती तिच्याप्रमाणे सात दिवस तो वाट पाहत राहिला; पण शमुवेल गिलगालास आला नाही म्हणून लोक त्याच्याकडून निघून पांगू लागले.
9तेव्हा “होमबली व शांत्यर्पणे माझ्याकडे आणा” असे सांगून शौलाने स्वतःच होम केला.
10त्याने होमाची समाप्ती केली तोच शमुवेल आला; तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करायला बाहेर गेला.
11शमुवेलाने त्याला विचारले, “तू हे काय केलेस?” तेव्हा शौलाने म्हटले, “जेव्हा मी पाहिले की लोक माझ्याकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाहीत आणि पलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले,
12तेव्हा मी म्हणालो, आता पलिष्टी लोक गिलगालात येऊन माझ्यावर हल्ला करतील, आणि मी तर परमेश्वराची विनंती अजून केली नाही; म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला.”
13शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणा केलास, तुझा देव परमेश्वर ह्याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस, मानली असतीस तर परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापले असते;
14पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे; कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाहीस.”
15मग शमुवेल तेथून निघून गिलगालाहून बन्यामिनाचे गिबा येथे गेला. शौलाने आपल्या बरोबरची माणसे मोजली ती सहाशे भरली.
16शौल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्याबरोबर असलेले लोक बन्यामिनाचे गिबा येथे राहिले; पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले.
17मग पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी शूवाल नामक प्रांताकडे अफ्राच्या वाटेने गेली.
18दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि तिसरी टोळी सबोईम खोर्याकडील प्रांताच्या वाटेने रानाकडे गेली.
19इस्राएलाच्या अवघ्या देशात कोणी लोहार मिळत नसे; कारण “इब्री लोकांना तलवारी अथवा भाले करता येऊ नयेत” असे पलिष्ट्यांनी म्हटले होते;
20परंतु फाळ, कुदळ, कुर्हाड व दाताळे ह्यांना धार लावायची असली तर सर्व इस्राएल लोक व्यक्तिशः पलिष्ट्यांकडे जात.
21त्यांची दाताळी, कुदळी, फाळ, कुर्हाडी व पराण्या ही बोथट राहत.
22ह्यामुळे युद्धाच्या दिवशी असे झाले की शौल व योनाथान ह्यांच्याबरोबर असलेल्या कोणाही मनुष्याच्या हाती तलवार किंवा भाला नव्हता; शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्याजवळ मात्र ही हत्यारे होती.
23नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले.
Currently Selected:
१ शमुवेल 13: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.