YouVersion Logo
Search Icon

१ राजे 21

21
अहाब आणि नाबोथाचा मळा
1वरील गोष्टीनंतर असे झाले की इज्रेलकर नाबोथ ह्याचा द्राक्षमळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा अहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता.
2अहाब नाबोथास म्हणाला, “तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन; त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो.”
3नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.”
4“मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.
5तेव्हा त्याची स्त्री ईजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, “आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे?”
6तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’
7त्याची बायको ईजबेल त्याला म्हणाली, “सांप्रत इस्राएलावर तुमची राजसत्ता आहे ना! चला, उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा; इज्रेलकर नाबोथाचा द्राक्षमळा मी तुम्हांला मिळवून देते.”
8मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली.
9तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, “उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा;
10आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.”
11ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणार्‍या वडील जनांनी व सरदारांनी केले.
12त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला, आणि नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवले.
13दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले; त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे.” ह्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला.
14त्यांनी ईजबेलीस सांगून पाठवले की, “नाबोथाला दगडमार केला व तो मेला.”
15नाबोथाला दगडमार होऊन तो मेला हे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “उठा, जो द्राक्षमळा इज्रेलकर नाबोथ पैसे घेऊन तुम्हांला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोथ आता जिवंत नाही, मेला आहे.”
16इज्रेलकर नाबोथ मरण पावला हे अहाबाने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला.
17इकडे एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,
18“ऊठ, शोमरोननिवासी इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या भेटीस जा; तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात आहे; त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे.
19तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील.”
20अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्‍या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस.
21पाहा, मी तुझ्यावर असे अरिष्ट आणीन की तुझा अगदी धुव्वा उडेल, आणि अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन;
22तू मला संताप आणला आणि इस्राएल लोकांना पाप करायला लावलेस, ह्यास्तव मी तुझ्या घराण्याचे नबाटाचा पुत्र यराबाम व अहीयाचा पुत्र बाशा ह्यांच्या घराण्यांप्रमाणे करीन.”
23ईजबेलीविषयीही परमेश्वर असे म्हणतो, “इज्रेलाच्या तटाजवळ ईजबेलीस कुत्री खातील.
24अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील.”
25(अहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही; त्याची बायको ईजबेल हिने त्याला उत्तेजन दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यासाठी स्वतःला विकून टाकले होते;
26परमेश्वराने इस्राएलापुढून देशातून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्मे केली.)
27एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.
28ह्यानंतर एलीया तिश्बी ह्याला परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की,
29“अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना? तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन.”

Currently Selected:

१ राजे 21: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in