YouVersion Logo
Search Icon

१ राजे 19

19
एलीया होरेबास पळून जातो
1एलीयाने काय काय केले, तसेच त्याने सर्व संदेष्टे तलवारीने कसे वधले हे सगळे अहाबाने ईजबेलीला कळवले.
2तेव्हा ईजबेलीने जासूद पाठवून एलीयाला बजावले की, “संदेष्ट्यांच्या जिवाच्या गतीसारखी तुझ्या जिवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनही अधिक करोत.”
3हे ऐकून एलीया जीव घेऊन पळाला; तो यहूदातील बैर-शेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले.
4तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला; आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.”
5तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला; तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, “ऊठ, हे खा.”
6त्याने पाहिले तो निखार्‍यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला.
7परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ, हे खा; कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे.”
8त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले; त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस व चाळीस रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहचला.
9तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला; तेव्हा पाहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्याला म्हणाला, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?”
10तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”
11त्याने त्याला म्हटले, “तू येथून बाहेर निघून जा; पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा.” तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असताना त्याच्यासमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडत होता; पण त्या वार्‍यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता.
12भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला; पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता; त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली.
13एलीयाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली ती अशी, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?”
14तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले, मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”
15परमेश्वर त्याला म्हणाला, “तू परत दिमिष्काच्या रानाकडे जा, तेथे जाऊन पोहचलास म्हणजे हजाएलाला अभिषेक करून अरामावर राजा नेम.
16निमशीचा पुत्र येहू ह्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेम; तसेच आबेल-महोला येथील शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम.
17हजाएलाच्या तलवारीपासून जो सुटेल त्याला येहू मारील; आणि येहूच्या तलवारीपासून जो सुटेल त्याला अलीशा मारील.
18तरीपण इस्राएलातील ज्या सात हजारांनी बआलमूर्तींपुढे गुडघे टेकले नाहीत व ज्या प्रत्येकाने मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, त्यांना मी वाचवीन.”
अलीशाला पाचारण
19तो तेथून निघाला तेव्हा त्याला शाफाटाचा पुत्र अलीशा भेटला; तो बैलांची बारा जोते चालवून शेत नांगरत असे, आणि तो स्वतः बाराव्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलीयाने आपला झगा त्याच्यावर टाकला.
20तेव्हा तो बैल सोडून एलीयाच्या मागून धावला; तो त्याला म्हणाला, “मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या; मग मी आपला अनुयायी होईन.” तो त्याला म्हणाला, “परत जा, मी तुझे काय केले?”
21मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची औते पेटवून त्यांवर मांस भाजले; ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलीयाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला.

Currently Selected:

१ राजे 19: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in