YouVersion Logo
Search Icon

१ राजे 17

17
दुष्काळाविषयी एलीयाचे भविष्य
1एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
2परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की,
3“येथून निघून पूर्व दिशेस जा, व यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक लपून राहा.
4त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील.”
5परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक जाऊन राहिला.
6कावळे त्याला भाकरी व मांस सकाळसंध्याकाळ आणून देत, व त्या ओहळाचे पाणी तो पिई.
7काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही.
एलीया आणि सारफथ येथील विधवा
8तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, 9“चल, सीदोनातील सारफथ नगरात जाऊन राहा; पाहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे.”
10त्याप्रमाणे तो सारफथ येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले; तिला हाक मारून तो म्हणाला, “मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये.”
11ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, “आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये.”
12ती म्हणाली, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही; मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करीत आहे; मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन; ते आम्ही खाऊ आणि मग मरू.”
13एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज.
14इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.”
15तिने जाऊन एलीयाच्या सांगण्याप्रमाणे केले; तो, ती व तिचे कुटुंब ह्यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला.
16परमेश्वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही.
17त्यानंतर घरधनिणीचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला.
18तेव्हा ती एलीयाला म्हणाली, “हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का?”
19तो तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला घेऊन ये.” त्याने त्याला तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछान्यावर निजवले.
20मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, “हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिच्यावर अरिष्ट आणलेस काय?”
21मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, “परमेश्वरा, हे माझ्या देवा, ह्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे.”
22परमेश्वराने एलीयाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊन तो पुनरपि जिवंत झाला.
23एलीया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्याला त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे.”
24ती स्त्री एलीयाला म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”

Currently Selected:

१ राजे 17: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in