१ राजे 13
13
यहूदा येथील संदेष्टा यराबामाला ताकीद देतो
1नंतर पाहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहूदातून बेथेल येथे आला; त्या वेळी यराबाम हवन करीत वेदीजवळ उभा होता.
2परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले : “हे वेदी, हे वेदी, परमेश्वर म्हणतो, पाहा, दाविदाच्या घराण्यात योशीया नावाचा एक पुत्र जन्मेल; जे उच्च स्थानांचे याजक तुझ्यावर होमहवन करतात त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करील, मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील.”
3त्याच दिवशी त्याने खूण दिली; तो म्हणाला, “परमेश्वराने सांगितलेली खूण हीच; पाहा, ही वेदी भंग पावेल आणि तिच्यावरील राख उधळली जाईल.”
4देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदीविरुद्ध जे हे शब्द उच्चारले ते राजा यराबाम ह्याने ऐकले तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, “त्याला धरा.” तेव्हा त्याने जो हात त्याच्याकडे केला होता तो वाळून गेला व तो त्याला मागे घेता येईना.
5परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाच्या माणसाने दिलेल्या खुणेप्रमाणे ती वेदी भंग पावली व तिच्यावरील राख उधळली गेली.
6राजाने त्या देवाच्या माणसाला विनंती केली की, “माझा हात पुन्हा पूर्ववत व्हावा म्हणून आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे माझ्यासाठी विनंती करून प्रार्थना कर.” देवाच्या माणसाने परमेश्वराला विनवणी केली तेव्हा राजाचा हात बरा होऊन पूर्वीसारखा झाला.
7राजा त्या देवाच्या माणसाला म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आणि काही उपाहार करून ताजातवाना हो; मी तुला काही इनाम देतो.”
8देवाचा माणूस राजाला म्हणाला, “तू मला आपले अर्धे घर दिले तरी मी तुझ्या येथे येणार नाही; ह्या ठिकाणी मी अन्नपाणी सेवन करणार नाही;
9परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू येथे अन्नपाणी सेवन करू नकोस आणि ज्या वाटेने जाशील तिने परत येऊ नकोस.”
10ज्या वाटेने तो बेथेलास गेला होता त्या वाटेने न जाता दुसर्या वाटेने तो गेला.
11बेथेल येथे त्या काळात एक वृद्ध संदेष्टा राहत असे; त्याच्या मुलांनी येऊन देवाच्या माणसाने त्या दिवशी बेथेलात जे काही केले त्याची सगळी हकिकत आपल्या बापाला कळवली; राजाला जे शब्द तो बोलला तेही त्याच्या मुलांनी आपल्या बापाला सांगितले.
12त्यांच्या बापाने त्यांना विचारले, “तो कोणत्या वाटेने गेला?” यहूदातून आलेला तो देवाचा माणूस कोणत्या वाटेने गेला हे त्यांनी पाहिले होते.
13तो आपल्या मुलांना म्हणाला, “गाढवावर खोगीर घाला.” त्यांनी गाढवावर खोगीर घातल्यावर तो त्यावर बसला.
14तो देवाच्या माणसाच्या पाठोपाठ गेला. तो त्याला एका एला झाडाखाली बसलेला आढळला. त्याने त्याला विचारले, “यहूदाहून आलेला देवाचा माणूस तूच काय?” तो म्हणाला, “मीच.”
15तो त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर घरी चल आणि भोजन कर.”
16तो म्हणाला, “मला तुझ्याबरोबर परत येता येत नाही; तुझ्या येथे मला जाता येत नाही; मी ह्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करणार नाही;
17कारण परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की, तू ह्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करू नकोस आणि ज्या वाटेने जाशील त्या वाटेने परत येऊ नकोस.”
18तेव्हा तो त्याला म्हणाला, “मीही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे; परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, ‘त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील.”’ पण हे त्याचे सांगणे खोटे होते.
19त्याने त्याच्याबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले.
20ते जेवायला बसले असताना त्याला परत आणणार्या त्या संदेष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले;
21यहूदाहून आलेल्या देवाच्या माणसाला त्याने मोठ्याने सांगितले, “परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वराच्या तोंडचे वचन तू अवमानलेस आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केली ती तू पाळली नाहीस.
22तू परत आलास आणि ज्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करू नकोस असे तुला सांगितले होते तेथे तू अन्नपाणी सेवन केलेस, ह्यास्तव तुझे प्रेत तुझ्या वाडवडिलांच्या थडग्यात जाणार नाही.”
23त्याचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्या माघारी आणलेल्या संदेष्ट्यासाठी गाढवावर खोगीर घातले.
24तेथून निघून तो चालला असताना वाटेने त्याला एका सिंहाने गाठून मारून टाकले; त्याचे प्रेत वाटेत तसेच पडून राहिले आणि ते गाढव त्याच्याजवळ उभे राहिले आणि सिंहही त्या प्रेताजवळ उभा राहिला.
25तिकडून जाणार्यायेणार्या लोकांनी वाटेत पडलेले ते प्रेत व त्याच्याजवळ उभा असलेला तो सिंह पाहिला; आणि त्यांनी तो वृद्ध संदेष्टा राहत होता त्या नगरात जाऊन हे वर्तमान कळवले.
26त्याला वाटेवरून परत आणणार्या त्या संदेष्ट्याने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वराच्या तोंडचे वचन अवमानणारा देवाचा माणूस तो हाच, म्हणूनच परमेश्वराने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले आणि परमेश्वराने त्याला सांगितलेल्या वचनाप्रमाणे सिंहाने त्याला फाडून ठार केले असावे.”
27तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “माझ्या गाढवावर खोगीर घाला,” तेव्हा त्यांनी खोगीर घातले.
28त्याने तेथे जाऊन पाहिले तेव्हा त्याचे प्रेत वाटेवर पडले आहे आणि त्याच्याजवळ गाढव व सिंह उभे आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले; सिंहाने त्याचे प्रेत खाऊन टाकले नव्हते आणि त्या गाढवास फाडून टाकले नव्हते.
29त्या संदेष्ट्याने देवाच्या माणसाचे प्रेत उचलून गाढवावर घालून परत आणले; त्याच्याबद्दल विलाप करावा व त्याला मूठमाती द्यावी म्हणून तो आपल्या नगराला परत आला.
30त्याने त्याचे प्रेत आपल्याच थडग्यात ठेवले आणि “अरेरे, माझ्या बंधो!” असे ओरडून लोकांनी त्याच्याबद्दल विलाप केला.
31त्याला मूठमाती दिल्यावर त्याने आपल्या पुत्रांना सांगून ठेवले की, “मी मेल्यावर देवाच्या माणसाला ज्या थडग्यात पुरले आहे तेथेच मला मूठमाती द्या आणि त्याच्या अस्थींनजीक माझ्या अस्थी ठेवा;
32कारण बेथेलातली वेदी आणि शोमरोन नगरातल्या उच्च स्थानांवरील सर्व मंदिरांविरुद्ध जे उद्गार त्याने परमेश्वराच्या वचनानुसार काढले त्यानुसार अवश्य घडून येणार.”
33एवढे झाले तरी यराबामाने आपला दुष्ट मार्ग सोडला नाही; त्याने उच्च स्थानांचे याजक सगळ्या लोकांतून नेमले; आपण उच्च स्थानांचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यांना त्याने समर्पित केले.
34ह्या गोष्टीने यराबामाच्या घराण्याला पाप लागले व तेणेकरून त्याचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले.
Currently Selected:
१ राजे 13: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.