YouVersion Logo
Search Icon

१ राजे 10

10
शबाची राणी शलमोनाला भेटण्यास येते
(२ इति. 9:1-12)
1परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली.
2ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली.
3शलमोनाने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती.
4शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, 5त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली.
6ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे.
7तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत.
8आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत.
9ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”
10तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.
11हीरामाची जहाजे ओफीर येथून सोने आणत त्याचप्रमाणे रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही विपुल आणत.
12राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले; त्याचप्रमाणे गाणार्‍यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनवल्या; असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही.
13शलमोनाने राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली.
शलमोनाचे वैभव आणि त्याची कीर्ती
(२ इति. 9:13-24)
14प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे;
15ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच.
16शलमोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली बनवल्या, एकेका ढालीस सहाशे शेकेल सोने लागले.
17तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून तीनशे लहान ढाली केल्या; प्रत्येक लहान ढालीस तीन माने (शेर) सोने लागले; राजाने ह्या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेवल्या.
18राजाने एक मोठे हस्तीदंती सिंहासन बनवले, व ते उत्तम सोन्याने मढवले.
19सिंहासनाला सहा पायर्‍या होत्या; आसनाचे ओठंगण वरून गोलाकार होते; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले होते.
20त्या सहा पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना एकेक असे एकंदर बारा सिंह केले होते; दुसर्‍या कोणत्याही राज्यात ह्यासारखे केलेले सिंहासन नव्हते.
21शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; चांदीचे एकही नव्हते; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नव्हते.
22समुद्रावर हीरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत.
23शलमोन राजा धन व शहाणपण ह्या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता.
24देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेवले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे लोक त्याच्या दर्शनाला येत.
25येणारा प्रत्येक जण चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणत असे.
शलमोनाने केलेला घोडे व रथ ह्यांचा व्यापार
(२ इति. 1:14-17; 9:25-28)
26शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्याजवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले.
27राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्यांप्रमाणे व गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले.
28शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्याची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत;
29एकेका रथाला सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्याला दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणत; हित्ती व अरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणत.

Currently Selected:

१ राजे 10: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in