YouVersion Logo
Search Icon

1 योहान 5:13-21

1 योहान 5:13-21 MARVBSI

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणार्‍या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे. (आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवीत राहावे). त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल; अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे; तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे; जो देवापासून जन्मला तो (ख्रिस्त) त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.