YouVersion Logo
Search Icon

1 योहान 2:1-12

1 योहान 2:1-12 MARVBSI

अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो. “मी त्याला ओळखतो” असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहोत. मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्‍याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रियजनहो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही; परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो; जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय. तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहीसा होत आहे, व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो, आणि त्याच्या ठायी अडखळण नसते; पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो; तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे.