YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 4

4
प्रेषित देवाला जबाबदार
1आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हांला मानावे.
2कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.
3तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला काहीच वाटत नाही, मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही.
4कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.
5म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.
6बंधुजनहो, मी तुमच्याकरता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुल्लोसाला लागू केल्या आहेत; ह्यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आमच्यापासून शिकावा म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकासाठी दुसर्‍यावर फुगणार नाही.
7तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?
8तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
9कारण मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहोत!
10आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत.
11ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत; आम्ही ठोसे खात आहोत, आम्हांला घरदार नाही.
12आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो; आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो;
13आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत.
पितृतुल्य बोध व सूचना
14तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो.
15कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे.
16म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.
17ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.
18मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत.
19तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन; तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन.
20कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही, पण सामर्थ्यात आहे.
21तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in