१ करिंथ 14
14
संदेश देण्याचे व ‘भाषा’ बोलण्याचे दान
1प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा.
2कारण अन्य भाषा1 बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो; कारण ते माणसाला समजत नाही; तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो.
3संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.
4अन्य भाषा बोलणारा स्वत:चीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो.
5तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्यात, तरी विशेषत: तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे; कारण मंडळीच्या उन्नतीकरता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे.
6तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्या द्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार?
7पावा, वीणा, असल्या नाद काढणार्या निर्जीव वस्तूंच्या भिन्नभिन्न नादांत भेद करून न दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, वीणेचा नाद कोणता, हे कसे समजेल?
8तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?
9त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वार्याबरोबर बोलणारे व्हाल.
10जगात भाषांचे बरेच प्रकार असतील, तरी एकही अर्थरहित नाही.
11म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणार्याला मी बर्बर असा होईन आणि बोलणारा मला बर्बर असा होईल;
12तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही, मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावीत म्हणून खटपट करा.
13अन्य भाषा बोलणार्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
14कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही.
15तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार.
16तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकारस्तुतीला “आमेन” कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही.
17कारण तुझे उपकारस्तुती करणे चांगले असेल, तरी त्याने2 दुसर्याची उन्नती होत नाही.
18तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो.
19तथापि मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसर्यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावेत हे मला आवडते.
20बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.
21नियमशास्त्रात लिहिले आहे की, “परभाषा बोलणार्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत,” असे प्रभूम्हणतो.
22म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणार्यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणार्यांसाठी चिन्हादाखल आहेत; संदेश हा विश्वास न ठेवणार्यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणार्यांसाठी आहे.
23सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय?
24परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खातरी होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो,
25त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व ‘तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे बोलून दाखवील.
उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता
26बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो; सर्वकाही उन्नतीसाठी असावे.
27अन्य भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत; अधिक नसावेत व त्यांनी पाळीपाळीने बोलावे; आणि एकाने अर्थ सांगावा.
28परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वत:बरोबर व देवाबरोबर बोलावे;
29संदेश देणार्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे, आणि इतरांनी निर्णय करावा;
30तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले, तर बोलणार्याने उगेच राहावे.
31सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल;
32संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात.
33कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळ्यांत जशी रीत आहे,
34तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे.
35त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.
36देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय?
37जर कोणी स्वत:ला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे.
38कोणी तसे समजत नसल्यास न समजो.
39म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका.
40सर्वकाही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.
Currently Selected:
१ करिंथ 14: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.