YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 10

10
इस्राएल लोकांच्या इतिहासावरून इशारा
1बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले;
2मेघ व समुद्र ह्यांच्या द्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला;
3त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले;
4आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्यामागे चालणार्‍या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.
5तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्यामुळे ‘त्यांचा रानात नाश झाला.’
6ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणांदाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये.
7त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; कारण “लोक खायलाप्यायला बसले, नंतर नाचतमाशा करायला उठले” असे शास्त्रात लिहिले आहे.
8त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.
9त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची2 परीक्षा पाहू नये.
10त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका.
11ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत3 त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.
12म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.
13मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.
मूर्तिपूजेचा त्याग
14म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.
15तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो; मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा.
16जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही?
17आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत.
18जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय?
19तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही;
20तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.
21तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाही प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही.
22आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?
23“मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही.
24कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसर्‍याचेही पाहावे.
25बाजारात खाटीक जे काही विकतात ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा;
26कारण “पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे.”
27विश्वास न ठेवणार्‍यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले, आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतील ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा;
28परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, “हा मूर्तीचा नैवेद्य आहे,” तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेक-बुद्धीखातर खाऊ नका. [कारण पृथ्वी व तिच्यावरील परिपूर्णता प्रभूची आहे.]
29येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुझी नव्हे तर त्याची; कारण माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसर्‍याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा?
30मी आभारपूर्वक खात असेन तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी?
31म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.
32यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका;
33तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवतो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in