YouVersion Logo
Search Icon

१ इतिहास 23

23
1दावीद आता वृद्ध व वयातीत झाला होता, म्हणून त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला इस्राएलावर राजा नेमले. लेवी आणि याजक ह्यांची विभागणी व त्यांची कामे 2त्याने इस्राएलाचे सर्व सरदार, याजक व लेवी ह्यांना एकत्र केले.
3तीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली; त्यांची शिरगणती केली ती अडतीस हजार भरली.
4त्यांतले चोवीस हजार परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले; सहा हजार अंमलदार व न्यायाधीश होते;
5चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्‍यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली.
6लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते.
7गेर्षोन्यातले लादान व शिमी;
8लादानाचे पुत्र यहीएल मुख्य व जेथाम व योएल असे तीन;
9शिमीचे पुत्र शलोमोथ, हजिएल व हारान असे तीन; हे लादानाच्या पितृकुळांचे मुख्य होते;
10आणि शिमीचे पुत्र यहथ, जीजा, यऊश व बरीया; हे चौघे शिमीचे पुत्र;
11यहथ हा प्रमुख व जीजा हा दुसरा; यऊश व बरीया ह्यांची पुत्रसंतती बहुत नव्हती, म्हणून त्यांचे एकच पितृकुळ ठरवले.
12कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;
13अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा.
14देवाचा माणूस मोशे ह्याचे पुत्र लेवी वंशात मोडत.
15मोशेचे पुत्र गेर्षोम व अलियेजर.
16गेर्षोमाच्या पुत्रांमध्ये शबुएल मुख्य,
17आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते.
18इसहाराच्या पुत्रांमध्ये शलोमीथ मुख्य;
19हेब्रोनाच्या पुत्रांमध्ये यरीया मुख्य; व अमर्‍या दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम् चौथा;
20उज्जीएलाच्या पुत्रांमध्ये मीखा मुख्य व इश्शिया दुसरा;
21मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश;
22एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या; त्यांचे भाऊबंद कीशाचे पुत्र ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
23मूशीचे पुत्र; महली, एदर व यरेमोथ असे तीन.
24लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.
25दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपल्या प्रजेस विसावा दिला आहे, व यरुशलेमात त्यांचा निरंतरचा निवास आहे;
26निवासमंडप व त्यामधील सेवेची उपकरणे ही लेव्यांना पुन्हा वाहून नेण्याची जरूर पडणार नाही.”
27दाविदाच्या शेवटल्या आज्ञेवरून वीस वर्षांच्या व त्यांहून अधिक वयाच्या लेव्यांची गणती झाली.
28अहरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिराची अंगणे व कोठड्या ह्यांत सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधीचे सर्व काम त्यांच्याकडे होते.
29समर्पित भाकर, अन्नबलीसाठी सपीठ, बेखमीर पापड, तव्यावर भाजलेले अथवा मळलेले सर्वकाही सिद्ध करण्याचे व सर्व प्रकारचे मोजमाप करण्याचे काम त्यांच्याकडे होते.
30सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे नित्य उपकारस्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे.
31तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.
32परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for १ इतिहास 23