YouVersion Logo
Search Icon

१ इतिहास 18

18
दावीद आपले साम्राज्य वाढवतो
(२ शमु. 8:1-14)
1ह्यानंतर दाविदाने पलिष्ट्यांना मार देऊन अंकित केले आणि गथ व त्याच्या आसपासची गावे पलिष्ट्यांच्या हातून काढून घेतली.
2मग त्याने मवाबास मार दिला आणि मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.
3सोबाचा राजा हदरेजर महानद फराताजवळील आपली सत्ता स्थापित करण्यासाठी जात असता दाविदाने त्याचा मोड केला.
4दाविदाने त्याच्यापासून एक हजार रथ, सात हजार स्वार व वीस हजार पायदळ हस्तगत केले; रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडल्या, मात्र त्यांतून शंभर रथांचे घोडे राखून ठेवले.
5दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हदरेजर ह्याला कुमक करण्यासाठी आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला.
6मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-तिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.
7हजरेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमास आणल्या.
8हदरेजर ह्याची टिभथ व कून ही नगरे होती तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले; त्यापासूनच पुढे शलमोनाने गंगाळसागर, खांब व पितळी पात्रे केली.
9दाविदाने हदरेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोवू ह्याच्या कानावर गेले;
10दाविदाने हदरेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता; म्हणून तोवू राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र हदोराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हदरेजर व तोवू ह्यांच्या लढाया होत असत; हदोरामाने बरोबर हरतर्‍हेची सोन्यारुप्याची व पितळेची पात्रे आणली.
11सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून आणलेल्या सोन्याचांदीबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला समर्पण केली. अदोमी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी व अमालेकी ह्या सर्वांपासून ही लूट आणली होती.
12सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने क्षार खोर्‍यात अठरा हजार अदोम्यांना मार दिला.
13त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.
दाविदाचे अंमलदार
(२ शमु. 8:15-18; 20:23-26)
14दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व नीतीने वागे.
15त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता;
16अहीटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अबीमलेख हे याजक होते; शवूशा हा चिटणीस होता;
17करेथी व पलेथी ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for १ इतिहास 18