YouVersion Logo
Search Icon

१ इतिहास 13

13
कोश यरुशलेमेस आणण्याचा दाविदाचा मानस
1दाविदाने सहस्रपती व शतपती ह्यांपैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला.
2दावीद इस्राएलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, “तुम्हांला ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर ह्याची तशी मर्जी असेल तर इस्राएलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यांना आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जे याजक व लेवी राहत आहेत त्यांना निरोप पाठवू की, त्यांनी आपल्याला येऊन मिळावे,
3आणि आपल्या देवाचा कोश आपल्याकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही कोशाकडे जाऊन प्रश्‍न करीत नव्हतो.”
4मंडळीच्या सर्व लोकांना ही गोष्ट योग्य वाटली व ते म्हणाले, “आपण हे करू.”
दावीद कोश आणण्यास जातो
(२ शमु. 6:1-11)
5तेव्हा देवाचा कोश किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शीहोर नाल्यापासून हमाथ घाटापर्यंतचे सर्व इस्राएल दाविदाने एकत्र केले.
6करूबारूढ असलेल्या परमेश्वर देवाच्या नामाचा कोश आणावा म्हणून दावीद व सर्व इस्राएल यहूदातले बाला उर्फ किर्याथ-यारीम येथे गेले.
7त्यांनी देवाचा कोश, अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला; उज्जा व अह्यो गाडी हाकत होते.
8दावीद व सर्व इस्राएल लोक देवासमोर जिवेभावे गीत गात आणि वीणा, सारंगी, डफ, झांजा व कर्णे वाजवत चालले.
9ते कीदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश धरायला आपला हात पुढे केला.
10तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने आपला हात कोशाला लावला म्हणून देवाने त्याला ताडन केले व तो त्याच्यापुढे गतप्राण झाला.
11परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला, त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले, ते आजवर चालत आहे.
12त्या दिवशी दाविदाला देवाचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?”
13दाविदाने तो कोश आपल्या येथे दावीदपुरात नेला नाही, तर ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एकीकडे नेऊन ठेवला.
14देवाचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरी तीन महिने राहिला; परमेश्वराने ओबेद-अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व ह्यांना बरकत दिली.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for १ इतिहास 13