उत्पत्ती 22

22
अब्राहामाची परीक्षा
1काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!”
“हा, मी इथे आहे,” तो उत्तरला.
2मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”
3अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला. 4तिसर्‍या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले. 5तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”
6अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले, 7इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?”
“काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले.
“आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?”
8अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले.
9परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले; 10मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला. 11त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!”
“हा मी इथे आहे,” तो उत्तरला.
12“मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.”
13अब्राहामाची नजर झुडूपात शिंगे अडकलेल्या एका एडक्याकडे गेली. त्याने तो एडका धरला आणि आपल्या पुत्राच्या जागी त्याने त्या एडक्याचा होमार्पण म्हणून बळी दिला. 14म्हणून अब्राहामाने त्या जागेचे नाव “याहवेह यिरेह”#22:14 अर्थात् याहवेह पुरवून देतील आजपर्यंत “याहवेहच्या डोंगरावर पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते.
15नंतर याहवेहच्या दूताने अब्राहामाला स्वर्गातून दुसर्‍यांदा हाक मारली. 16ते म्हणाले, “मी याहवेह, स्वतःचीच शपथ घेऊन तुला सांगतो की, कारण तू हे केलेस आणि स्वतःच्या पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला अर्पण करण्यास तू नाकारले नाहीस, 17म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल, 18आणि तू माझ्या आज्ञा पाळल्या आहेस, म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या वंशजापासून आशीर्वादित होतील.”
19यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते सर्वजण बेअर-शेबा येथे आपल्या घरी परतले आणि अब्राहाम बेअर-शेबा येथे राहिला.
नाहोराचे पुत्र
20काही वेळेनंतर अब्राहामाला सांगण्यात आले, “त्याचा भाऊ नाहोर याची पत्नी मिल्का हिलाही मुले झाली आहेत:
21ऊस हा त्याचा प्रथमपुत्र, त्याचा भाऊ बूज व
कमुवेल (अरामचा पिता)
22आणि केसद, हजो, पिलदाश, यिदलाप व बेथुएल.”
23बेथुएल रिबेकाहचा पिता झाला.
अब्राहामाचा भाऊ नाहोराची पत्नी मिल्का हिला हे आठ पुत्र झाले.
24नाहोराची उपपत्नी रेऊमा हिलाही पुत्र झाले:
तेबाह, गहाम, तहश व माकाह.

المحددات الحالية:

उत्पत्ती 22: MRCV

تمييز النص

شارك

نسخ

None

هل تريد حفظ أبرز أعمالك على جميع أجهزتك؟ قم بالتسجيل أو تسجيل الدخول

فيديو ل उत्पत्ती 22