उत्पत्ती 15

15
याहवेहचा अब्रामाशी करार
1या गोष्टीं घडल्यानंतर अब्रामाला दृष्टान्तात याहवेहकडून हा संदेश मिळाला:
“अब्रामा, भिऊ नको;
मीच तुझी ढाल,#15:1 किंवा सार्वभौम
तुझे अत्यंत महान प्रतिफळ आहे.”
2यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?” 3अब्रामाने असेही म्हटले, “तुम्ही मला पुत्र दिलेला नाही; म्हणून माझा सेवकच माझा वारस होईल.”
4तेव्हा त्याच्याकडे याहवेहचे वचन आले, “तुझ्या मालमत्तेचा वारसदार हा मनुष्य होणार नाही, परंतु तुझे मांस व तुझे रक्त असलेला तुझा पुत्र तुझा वारस होईल.” 5मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल.”
6अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.
7त्यांनी त्याला सांगितले, “मी याहवेह आहे. मी ही भूमी कायमची वतन करून देण्यासाठी तुला खास्द्यांच्या ऊर या शहरातून येथे आणले आहे.”
8पण अब्रामाने विचारले, “सार्वभौम याहवेह, मला हे वतन मिळेल ते मी कसे समजू?”
9मग याहवेह त्याला म्हणाले, “तू तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, तसेच एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घेऊन ये.”
10अब्रामाने हे सर्व आणले आणि त्या प्राण्यांचा वध करून ते त्याने मधोमध कापले; व त्यांचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले; पण पक्षी मात्र विभागले नाही. 11त्या प्राण्यांच्या मृतशरीरांवर गिधाडांनी झडप घातली, तेव्हा अब्रामाने गिधाडांना हुसकावून लावले.
12सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला. 13मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. 14परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील. 15पण तू चांगला म्हातारा होऊन मरण पावशील व शांतीने तुझ्या पूर्वजांबरोबर पुरला जाशील. 16चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही#15:16 अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही म्हणजे अमोरी लोकांची पापे अद्याप त्यांचा नाश करण्याची हमी देत नाहीत.”
17नंतर सूर्य मावळला आणि अंधार पडला तेव्हा अब्रामाने त्या प्राण्यांच्या मृतशरीराच्या दोन ढिगांमधून धुमसते अग्निपात्र आणि पेटलेली मशाल जाताना पाहिली. 18त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात#15:18 फरात ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश— 19केनी, कनिज्जी, कदमोनी, 20हिथी, परिज्जी, रेफाईम, 21अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे.”

المحددات الحالية:

उत्पत्ती 15: MRCV

تمييز النص

شارك

نسخ

None

هل تريد حفظ أبرز أعمالك على جميع أجهزتك؟ قم بالتسجيل أو تسجيل الدخول

فيديو ل उत्पत्ती 15