የYouVersion አርማ
የፍለጋ አዶ

उत्प. 50

50
1त्यानंतर योसेफ आपल्या बापाला कवटाळून खूप रडला. त्याने त्याची चुंबने घेतली. 2योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले. 3त्याकरता त्यांना चाळीस दिवस लागले, कारण तशा खास पद्धतीने प्रेत तयार करण्यासाठी तेवढा वेळ घेत. मिसरच्या लोकांनी त्याच्यासाठी सत्तर दिवस शोक केला. 4सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा, 5‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन. 6फारोने उत्तर दिले, “जा आणि आपल्या बापाला शपथ दिल्याप्रमाणे त्यास पुरून ये.” 7तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले. 8आपले कुटुंबीय, आपले भाऊ व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या बापाचे कुटुंबीय योसेफाबरोबर होते. फक्त लहान मुले व पशू एवढेच गोशेन प्रांतात मागे राहिले होते. 9तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथांत बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली. 10ते यार्देन नदीच्या पूर्वेस अटादाच्या खळ्यावर आले, तेव्हा त्यांनी फारच मोठा शोक केला. योसेफाने त्याच्या पित्याकरिता सात दिवस शोक केला. 11कनान देशात राहणाऱ्या लोकांनी अटादाच्या येथील हे प्रेतक्रियेचे विधी व संस्कार पाहिले तेव्हा ते म्हणाले, “मिसरच्या लोकांचा हा फारच दुःखाचा प्रसंग आहे.” त्यामुळे आता त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव पडले आहे. 12अशा प्रकारे याकोबाच्या मुलांनी आपल्या वडिलाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले; 13त्यांनी त्याचे प्रेत कनान देशात नेऊन एफ्रोन हित्ती याजकडून कबरस्तान म्हणून उपयोगी पडावे यासाठी अब्राहामाने विकत घेतलेल्या मम्रे येथील शेतातील मकपेला गुहेत पुरले. 14आपल्या वडिलाच्या प्रेतक्रियेनंतर योसेफ आणि त्याच्याबरोबर गेलेला सर्व समुदाय मिसरला माघारी गेला.
योसेफाने आपल्या भावांना दिलेले आश्वासन
15याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.” 16तेव्हा त्या भावांनी योसेफाला येणेप्रमाणे निरोप पाठवला, “तुझ्या वडिलाने मरण्यापूर्वी आम्हांला अशी आज्ञा दिली, 17तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. 18योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” 19मग योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका. मी काय देवाच्या स्थानी आहे काय? 20तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आज तुम्ही ते पाहत आहात. 21तेव्हा आता तुम्ही भिऊ नका. मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला.
योसेफाचा मृत्यू
इब्री. 11:22
22योसेफ आपल्या वडिलाच्या कुटुंबियांसह मिसरमध्ये राहिला. तो एकशे दहा वर्षांचा असताना मरण पावला. 23योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली. त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने माखीराची मुले ही पाहिली. 24योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हास या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.” 25मग योसेफाने इस्राएल लोकांस शपथ घ्यायला लावली. तो म्हणाला, “देव जेव्हा तुम्हास येथून काढून पुढे घालून त्या नवीन देशात घेऊन जाईल तेव्हा माझे शरीर तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाल असे मला वचन द्या.” 26योसेफ एकशे दहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते मिसर देशामध्ये शवपेटीत ठेवले.

Currently Selected:

उत्प. 50: IRVMar

ማድመቅ

Share

Copy

None

ያደመቋቸው ምንባቦች በሁሉም መሣሪያዎችዎ ላይ እንዲቀመጡ ይፈልጋሉ? ይመዝገቡ ወይም ይግቡ