የYouVersion አርማ
የፍለጋ አዶ

निर्ग. 3

3
मोशेला झालेले पाचारण
निर्ग. 6:2-7; 11:1-4; 12:35-36
1तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला. 2तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास एका झुडपातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत दर्शन दिले. मोशेने पाहिले की, झुडूप अग्नीने जळत होते, परंतु ते जळून भस्म होत नव्हते. 3मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.” 4मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.” 5देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. 6तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहायला तो घाबरला. 7परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे. 8त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत#सुपीक जमीन, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. 9तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे. 10तर आता, माझ्या इस्राएली लोकांस मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी मी तुला फारोकडे पाठवत आहे.” 11परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांस मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?” 12देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”
देवाच्या नावाचे प्रकटीकरण
13मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?” 14देव मोशेस म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांस सांग, मी आहे याने मला तुम्हांकडे पाठवले आहे.” 15देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हांकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे, व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल; 16तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांना एकत्रित करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हांकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हांसोबत काय घडले आहे हे मला कळले आहे. 17आणि मी तुम्हास मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन व कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईन, असे मी सांगितले आहे हे त्यांना कळव. 18ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे. 19परंतु मला माहीत आहे की, मिसराचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास माझे बाहुबल दाखविले तरी तो तुम्हास जाऊ देणार नाही; 20तेव्हा मी मिसर देशात आपले बाहुबल दाखवून, ज्या अद्भुत कृती मी करणार आहे, त्यांचा मारा मी त्याजवर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल; 21आणि या लोकांवर मिसऱ्यांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. आणि असे होईल की, तुम्ही निघाल तेव्हा रिकामे निघणार नाही. 22तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीकडून व आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडून भेटवस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेटवस्तू देतील; ते तुम्हा लोकांस सोन्यारुप्याचे दागिने व कपडे भेट म्हणून देतील. तुम्ही ते आपल्या मुलांच्या व मुलींच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसराच्या लोकांस लुटाल.”

Currently Selected:

निर्ग. 3: IRVMar

ማድመቅ

Share

Copy

None

ያደመቋቸው ምንባቦች በሁሉም መሣሪያዎችዎ ላይ እንዲቀመጡ ይፈልጋሉ? ይመዝገቡ ወይም ይግቡ