YouVersion Logo
تلاش

मत्तय 4

4
सैतानाकडून येशूंची परीक्षा
1मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. 2चाळीस दिवस चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली. 3मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना, भाकरीत रूपांतर होण्यास सांग.”
4तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाद्वारे जगेल’#4:4 अनु 8:3 असे लिहिले आहे.”
5मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले. 6तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे:
“तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल,
आणि तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू
नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.”#4:6 स्तोत्र 91:11-12
7तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे की: प्रभू तुझा परमेश्वर त्यांची परीक्षा पाहू नको.”#4:7 अनु 6:16
8मग सैतानाने येशूंना एका उंच डोंगराच्या शिखरावर नेले. तेथून त्याने त्यांना जगातील सर्व राज्ये व त्याचे थाटमाट आणि गौरव दाखविले. 9“जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.”
10येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, येथून चालता हो! ‘कारण असे लिहिले आहे की, केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’#4:10 अनु 6:13
11मग सैतान त्यांना सोडून निघून गेला आणि देवदूतांनी येऊन त्यांची सेवा केली.
येशू उपदेशास प्रारंभ करतात
12योहानाला बंदीवासात टाकले आहे हे ऐकताच, येशू गालील प्रांतात निघून गेले. 13नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्‍यावरील कफर्णहूम या गावी गेले. 14या घटनेचे संदेष्टा यशया याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे:
15“जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत,
समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत,
गैरयहूदीयांचा गालील प्रांत—
16अंधारात बसलेल्या लोकांनी
मोठा प्रकाश पाहिला;
मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर
प्रकाश उदय पावला आहे.”#4:16 यश 9:1-2
17तेथून पुढे येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
प्रथम शिष्यांस पाचारण
18येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना जाळे टाकताना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते. 19येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” 20लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
21किनार्‍यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलावले, 22आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.
येशू रूग्णांस बरे करतात
23येशू सभागृहामध्ये शिक्षण देत, राज्याची शुभवार्ता चहूकडे सांगत, व लोकांचा प्रत्येक प्रकारचा रोग आणि प्रत्येक प्रकारचा विकार बरे करीत सर्व गालील प्रांतात फिरले. 24त्याचा वृतांत गालील प्रांताच्या सीमेपलीकडेही पसरत गेला. त्यामुळे सीरियासारख्या दूर दूरच्या ठिकाणाहूनही आजारी लोक बरे होण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कसल्याही प्रकारचा आजार किंवा वेदना झालेले, भूतग्रस्त किंवा झटके येत असलेले, तसेच पक्षघात झालेले लोक, या सर्वांना त्यांनी बरे केले. 25गालील प्रांत, दकापलीस#4:25 दकापलीस म्हणजे दहा गावे, यरुशलेम, यहूदीया आणि यार्देन पलीकडील प्रदेशातून येथूनही मोठा समुदाय त्यांच्यामागे आला.

موجودہ انتخاب:

मत्तय 4: MRCV

سرخی

شئیر

کاپی

None

کیا آپ جاہتے ہیں کہ آپ کی سرکیاں آپ کی devices پر محفوظ ہوں؟ Sign up or sign in