उत्पत्ती 48

48
एफ्राईम व मनश्शेह
1काही दिवसानंतर योसेफाला कळविण्यात आले, “तुझे वडील आजारी आहेत.” तेव्हा तो मनश्शेह व एफ्राईम या आपल्या दोन पुत्रांना आपल्यासोबत घेऊन निघाला. 2जेव्हा याकोबाला सांगण्यात आले, “तुझा पुत्र योसेफ तुझ्याकडे आला आहे,” तेव्हा इस्राएल आपली सर्व शक्ती एकवटून उठून बिछान्यावर बसला.
3याकोब हा योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वराने मला कनान देशात लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला 4आणि मला म्हणाले, ‘मी तुला फलद्रूप करेन आणि तुझी संख्या वाढवेन. मी तुला लोकांचा समुदाय करेन आणि तुझ्यानंतर हा देश तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन.’
5“आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे. 6परंतु यानंतर तुला जी मुलेबाळे होतील ती तुझी होतील. त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. 7मी पद्दन-अराम येथून परत येत होतो आणि कनान देशात एफ्राथपासून थोड्याच अंतरावर होतो, तेव्हा राहेलच्या मृत्यूचे दुःख माझ्यावर पडले आणि मी तिला एफ्राथ गावाच्या थोड्या अंतरावर पुरले” (म्हणजे बेथलेहेम).
8जेव्हा इस्राएलने योसेफाच्या पुत्रांना पाहिले, त्याने विचारले, “ही कोण आहेत?”
9योसेफाने त्याच्या पित्याला म्हटले, “परमेश्वराने मला इथे दिलेले हे माझे पुत्र आहेत.”
इस्राएल त्याला म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण आणि म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
10इस्राएलाची दृष्टी म्हातारपणामुळे अशक्त झाली होती, त्यामुळे तो नीट पाहू शकत नव्हता, म्हणून योसेफाने त्यांना त्याच्याजवळ आणले आणि त्याच्या पित्याने त्यांचे चुंबन घेतले व त्यांना कवटाळले.
11इस्राएल योसेफाला म्हणाला, “मी तुला परत पाहीन असे मला कधीच वाटले नव्हते, पण परमेश्वराने मला तुझे पुत्रही पाहू दिलेत.”
12नंतर योसेफाने त्यांना इस्राएलाच्या मांडीवरून बाजूला केले आणि जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. 13मग योसेफाने दोघांना घेतले आणि एफ्राईमला योसेफाच्या उजव्या व इस्राएलाच्या डाव्या हातास आणि मनश्शेहला योसेफाच्या डाव्या आणि इस्राएलाच्या उजव्या हातास असे त्याच्याजवळ नेले. 14परंतु इस्राएलने त्याचा उजवा हात पुढे केला आणि तो एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला, जरी तो धाकटा होता आणि हात ओलांडून त्याने आपला डावा हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवला, जरी मनश्शेह प्रथम जन्मलेला होता.
15नंतर त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले,
“ज्या परमेश्वरापुढे माझे पूर्वज
अब्राहाम आणि इसहाक विश्वासाने चालले,
तेच परमेश्वर आजपर्यंत माझ्या जीवनाचे
मेंढपाळ राहिले आहे,
16ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले,
ते या मुलांना आशीर्वादित करोत.
माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव
या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो,
त्यांना पुष्कळ मुलेबाळे व
गोत्र लाभोत.”
17त्याच्या पित्याने आपला उजवा हात एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवलेला पाहून योसेफ नाराज झाला आणि त्याने एफ्राईमच्या डोक्यावरील हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवावा म्हणून त्याने त्याच्या पित्याचा हात उचलला. 18योसेफ त्याला म्हणाला, “नाही बाबा, हा प्रथम जन्मलेला आहे; तुमचा उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवा.”
19परंतु त्याच्या वडिलांनी ते नाकारले आणि ते म्हणाले, “मला माहीत आहे, माझ्या मुला, मला माहीत आहे. त्याचीही कुळे होतील आणि तो देखील महान होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्याच्याहीपेक्षा थोर होईल आणि त्याचे लोक राष्ट्रांचे समुदाय बनतील.” 20त्याने त्या दिवशी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला,
“इस्राएली लोक एकमेकांना आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणोत:
‘एफ्राईम व मनश्शेह यांच्याप्रमाणे परमेश्वर तुझे कल्याण करो.’ ”
अशाप्रकारे याकोबाने एफ्राईमाला मनश्शेहपेक्षा श्रेष्ठ ठरविले.
21नंतर इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता लवकरच माझा अंत होईल; परंतु परमेश्वर तुझ्याबरोबर राहतील आणि तुला तुझ्या वाडवडीलांच्या देशामध्ये परत नेतील. 22आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.”

Označeno

Deli

Kopiraj

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in