उत्पत्ती 47
47
1योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.” 2त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना निवडले आणि फारोहपुढे उपस्थित केले.
3फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?”
त्यांनी फारोहला उत्तर दिले, “तुमचे सेवक आमच्या पूर्वजांप्रमाणेच मेंढपाळ आहोत.” 4ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”
5फारोह योसेफाला म्हणाला, “तुझे वडील व भाऊ तुझ्याकडे आले आहेत, 6आणि संपूर्ण इजिप्त देश तुझ्यासमोर आहे; या देशातील उत्तम भागात तुझ्या पित्याला आणि भावांना राहण्यास दे. त्यांना गोशेन येथे राहू दे. आणि त्यांच्यापैकी कोणी विशेष क्षमता असणारे असतील तर त्यांच्यावर माझ्याही गुरांची जबाबदारी सोपवून दे.”
7मग योसेफाने आपला पिता याकोब याला फारोहकडे उपस्थित केले आणि याकोबाने फारोहला आशीर्वाद#47:7 किंवा अभिवादन केले दिला. 8फारोहने त्याला विचारले, “तुमचे किती वय आहे?”
9आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.” 10नंतर याकोबाने फारोहला आशीर्वाद दिला आणि त्याच्या उपस्थितीतून निघाला.
11याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली. 12योसेफाने आपला पिता, आपले भाऊ आणि आपल्या पित्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येनुसार अन्नधान्य पुरविले.
योसेफ आणि दुष्काळ
13मात्र, दुष्काळ उग्र असल्याने संपूर्ण प्रदेशात अन्न नव्हते; दुष्काळामुळे इजिप्त आणि कनान दोन्ही देश कष्टमय झाले. 14योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला. 15जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?”
16यावर योसेफाने उत्तर दिले, “तुमचे पैसे संपले आहेत, तर मग तुमची गुरे मला द्या आणि त्यांच्या मोबदल्यात मी तुम्हाला अन्नधान्य देतो.” 17त्याप्रमाणे अन्नधान्यासाठी लोकांनी आपले सर्व घोडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि गाढवे योसेफाकडे आणली आणि त्याने त्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य दिले.
18ते वर्ष संपल्यावर, पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “आम्ही धन्यापासून हे सत्य लपवू शकत नाही की आमचा पैसा संपला आणि आमची गुरे तुमची झाली आहेत आणि आता आमच्याजवळ आमच्या धन्यासाठी फक्त आमची शरीरे व आमच्या जमिनी राहिल्या आहेत. 19आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का? आता आम्हाला आमच्या जमिनीसह विकत घ्या म्हणजे आम्ही फारोहचे गुलाम होऊ. अन्नासाठी आम्ही स्वतःचा विक्रय केला तरच आम्ही जगू आणि जमिनीही मोकळ्या राहणार नाहीत.”
20याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली, 21तसेच योसेफाने इजिप्त देशातील एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतच्या शहरातील सर्व लोकांना गुलाम बनविले. 22याजकांच्या जमिनी मात्र योसेफाने विकत घेतल्या नाहीत, कारण फारोहकडून त्यांना निर्धारित अन्नधान्य पुरविले जात असे आणि त्यामुळे त्यांनी जमिनी विकल्या नाही.
23मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा. 24ज्यावेळी तुम्ही कापणी कराल. त्यावेळी तुमच्या उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोहला द्यावा. राहिलेले चार हिस्से पुढील वर्षाच्या बियाण्यांसाठी आणि तुम्हासाठी, तुमचे कुटुंब व मुलाबाळांच्या खाण्यासाठी ठेवा.”
25लोक म्हणाले, “तुम्ही आमचे प्राण वाचविले आहेत, आमच्या धन्याच्या दृष्टीत आम्हाला दया प्राप्त होवो; आम्ही फारोहच्या गुलामगिरीत राहू.”
26म्हणून योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी शिवाय इतर सर्व जमिनीतील पिकांचा पाचवा हिस्सा फारोहला देण्यात यावा, असा इजिप्त देशभर कायदा केला. हा कायदा आजवर चालू आहे.
27अशा रीतीने इस्राएली इजिप्तच्या गोशेन प्रांतात राहू लागले, आणि त्यांनी तिथे जमीनजुमला संपादन केला व ते फलद्रूप होऊन संख्येने खूप वाढले.
28इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती. 29इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस, 30परंतु जेव्हा मी माझ्या पूर्वजांसोबत झोपी जाईन, मला इजिप्तमधून बाहेर ने आणि त्यांना जिथे पुरले आहे, तिथे मला मूठमाती दे.”
त्याने म्हटले, “तुम्ही जसे सांगितले आहे तसेच मी करेन.”
31“मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली.
Currently Selected:
उत्पत्ती 47: MRCV
Označeno
Deli
Kopiraj

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.