उत्प. 5

5
आदामाचे वंशज
1 इति. 1:1-4; लूक 3:36-38
1आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला. 2त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
3आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; 4शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. 5अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
6शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला 7अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 8शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
9अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला; 10केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 11अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
12केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला; 13महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 14केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
15महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला; 16यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 17महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
18यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला; 19हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 20यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. 21हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला; 22मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या; 23हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला; 24हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
25मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला. 26लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. 27मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
28लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला. 29लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
30नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. 31लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
32नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.

Nu geselecteerd:

उत्प. 5: IRVMar

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in