रूथ 1:16-22
रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव; तुम्ही मराल तेथे मीही मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल; मृत्युखेरीज तुमचा-माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.” आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहचल्या. त्या बेथलेहेमास जाऊन पोहचल्या, तेव्हा त्यांना पाहून सर्व नगर गलबलून गेले; तेथील बायका म्हणू लागल्या, “ही नामीच काय?” ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले; परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्वसमर्थाने मला पिडले आहे तर मला नामी का म्हणता? ह्याप्रमाणे नामी आपली सून मवाबी रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली; त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.
रूथ 1:16-22