रोमकरांस पत्र 6:5-23
कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले, असे माना. ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे; कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
रोमकरांस पत्र 6:5-23