स्तोत्रसंहिता 19:7-12
परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणार्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.
स्तोत्रसंहिता 19:7-12