स्तोत्रसंहिता 119:1-48
जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य! जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य! ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही. तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन. मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो. तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो. मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही. आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. मी ह्या जगात केवळ उपरा आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नकोस. तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे. गर्विष्ठांना तू धमकावतोस, तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत. निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझे निर्बंध पाळतो. अधिपतीही बसून आपसांत माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझे मंत्री आहेत. माझा जीव धुळीस मिळाला आहे; तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडला आणि तू मला उत्तर दिलेस; तू आपले नियम मला शिकव. तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे. मी सत्याचा मार्ग निवडला आहे; मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला फजीत होऊ देऊ नकोस. तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळव. तुझ्या मार्गांत मला नवजीवन दे. तू आपले भय धरणार्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत. पाहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे; तू आपल्या न्याय्यत्वाने मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो; म्हणजे माझी निंदा करणार्याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही. मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन. आणि तुझ्या नियमांचे मनन करीन.
स्तोत्रसंहिता 119:1-48