स्तोत्रसंहिता 103:8-18
परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. मानवप्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे; वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते, आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही; परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणार्यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो; म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
स्तोत्रसंहिता 103:8-18