स्तोत्रसंहिता 103:1-22
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो; त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. मानवप्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे; वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते, आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही; परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणार्यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो; म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो, त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर.
स्तोत्रसंहिता 103:1-22