नीतिसूत्रे 10:17-32
बोधाकडे लक्ष पुरवणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो. गुप्तपणे द्वेष करणार्याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो. फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा. नीतिमानाची जिव्हा उत्कृष्ट रुप्यासारखी आहे; दुर्जनांचे हृदय कवडीमोल आहे. नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते. दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, आणि नीतिमानाची इच्छा पूर्ण होते. वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्या पायासारखा आहे. जशी आंब दातांना, जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी मनुष्य त्याला पाठवणार्यांना आहे. परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. नीतिमानाची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल. परमेश्वराचा मार्ग सात्त्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणार्यांना तो नाशकारक आहे, नीतिमान कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत. नीतिमानाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जिव्हा छाटली जाईल. नीतिमानाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते.
नीतिसूत्रे 10:17-32