मत्तय 6:24-34
कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो; तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाही काय? ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.
मत्तय 6:24-34