मत्तय 5:3-20
“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’ जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. ‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
मत्तय 5:3-20