मत्तय 5:13-48
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ‘खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस. ‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. ‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते. मी तर तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. ‘खोटी शपथ वाहू नकोस तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खर्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘ते देवाचे राजासन आहे;’ ‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे. ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. ‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैर्याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’
मत्तय 5:13-48