लूक 19:37-44
तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, “‘प्रभूच्या नावाने येणारा’ राजा ‘धन्यवादित असो;’ स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.” त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला, “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”
लूक 19:37-44