लूक 12:39-48
आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.
लूक 12:39-48