लूक 1:36-56
पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली; आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की, अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली; आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्लासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.” तेव्हा मरीया म्हणाली : “‘माझा जीव प्रभूला’ थोर मानतो, आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळे माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’ कारण ‘त्याने’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील! कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत; आणि ‘त्याचे नाव पवित्र आहे.’ आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’ त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’ ‘त्याने अधिपतींना’ राजासनांवरून ‘ओढून काढले आहे’ व ‘दीनांस उंच केले आहे.’ ‘त्याने भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,’ व ‘धनवानांस रिकामे लावून दिले आहे.’ ‘आपल्या पूर्वजांस’ त्याने सांगितले ‘त्याप्रमाणे अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे.” नंतर मरीया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली.
लूक 1:36-56