लूक 1:35-45
देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. त्या दिवसांत मरीया डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास घाईघाईने गेली; आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की, अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली; आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्लासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”
लूक 1:35-45