योहान 14:15-31
माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील. मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रकट होईन.” यहूदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वत: आम्हांला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?” येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही; जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल. मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. ‘मी जातो आणि तुमच्याकडे येईन,’ असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही; परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.
योहान 14:15-31