यिर्मया 17:10-17
“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.” तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल. आमच्या पवित्रस्थानाचे स्थळ, सनातन काळापासून उच्च व वैभवी सिंहासन आहे. हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवनविषय आहेस. पाहा, ते मला म्हणतात, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या!” मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतली नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही हे तुला ठाऊक आहे; जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते. तू मला भीतिप्रद होऊ नकोस, विपत्काळी तू माझा आश्रय आहेस.
यिर्मया 17:10-17