यशया 48:17-22
परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी नीतिमत्ता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती; तुझा वंश रेतीइतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नाव माझ्यासमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते.” तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.” त्यांना त्याने रुक्ष भूमीवरून नेले, तेथे त्यांना तहान लागली नाही; त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहवले; त्याने खडक फोडला तो पाणी खळखळा वाहिले. परमेश्वर म्हणतो, “दुर्जनांना शांती नसते.”
यशया 48:17-22